इस्रोच्या चंद्रयान-२ या यानाचे जानेवारीत प्रक्षेपण

रायगड माझा विशेष वृत्त :

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येत्या जानेवारी महिन्यात चंद्रयान-२ या महत्त्वाकांक्षी अंतराळ यानाचे प्रक्षेपण करणार आहे. इस्रोचे चेअरमन के. शिवन यांनी ही माहिती दिली. चंद्रयान-२ हे अभियान सर्वात कठीण अभियान असल्याचे के. शिवन यांनी म्हटले आहे. चंद्रयान-२ या अंतराळ यानाचे जीएसएलव्ही-एमके-३-एम १ या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण केले जाणार आहे. या अभियानाबाबत देशभरातील तज्ज्ञांचे मत जाणून घेतले गेल्याचेही शिवन यांनी म्हटले आहे. तज्ज्ञांनी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली असून, हे सर्वात कठीण अभियान असल्याचा अभिप्राय त्यांनी दिल्याचेही शिवन यांनी म्हटले आहे.

चंद्रयान-२च्या वजनात वाढ होत ते आता ३.८ टन एवढे झाल्याची माहिती के. शिवन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. याच कारणामुळे चंद्रयान-२चे जीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपण करता येणार नसल्याचेही ते म्हणाले.

गरजेनुसार प्रक्षेपण यान अद्ययावत करून त्याला जीएसएलव्ही-एमके-३ असे रुप देण्यात आले आहे. याचे प्रक्षेपण ३ जानेवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान करण्याचे ठरवण्यात आले आहे. दक्षिण ध्रुवाच्या जवळ जाणारे हे जगातील पहिलेच अभियान असणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.