उत्तराखंडमध्ये ‘केदारनाथ’वर बंदी

उत्तराखंड : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for kedarnath movie

अभिनेत्री सारा अली खान आणि सुशात सिंह राजपूत यांच्या बहुचर्चित ‘केदारनाथ’ या चित्रपटावर उत्तराखंडमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटातून लव्ह जिहादचा प्रचार केल्याचा आणि हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी आणि मंदिरातील पुजाऱ्यांनी केला होता. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. उत्तराखंड कोर्टाने चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिल्यानंतरही उत्तराखंडमध्ये या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे.
‘केदारनाथ’ हा चित्रपट ७ डिसेंबर रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटात एका श्रीमंत घरातील मुक्कू नावाची हिंदू मुलगी मन्सूर नावाच्या एका मुस्लिम गाइडच्या प्रेमात पडते. केदारनाथला २०१३मध्ये आलेल्या पुरांच्या पार्श्वभूमीवर फुलणारं या दोघांचं प्रेम आणि दोघांना करावा लागणारा संघर्ष असं या चित्रपटाचं कथानक आहे. यामुळेच या चित्रपटातून लव्ह जिहादचा प्रचार होत असल्याचा आरोप करत त्यावर बंदी घालण्याची मागणी उत्तराखंडमधील स्थानिकांनी केली होती. भाजपनेही या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली होती. सिनेमाची टॅगलाईन आणि टायटलवरही स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उत्तराखंडमध्ये या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या आधी ‘केदारनाथ’च्या प्रदर्शनाला उत्तराखंड सरकारने हिरवा कंदील दाखवला होता. मात्र भाजपसह स्थानिक राजकीय पक्षांनी या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर या सिनेमाचा आढावा घेण्यासाठी राज्यसरकारने भाजप नेते सतपाल सिंह महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ४ सदस्यांची एक समिती स्थापन केली होती.
‘आमच्या समितीने या सिनेमासंदर्भातील शिफारशी मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. त्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्याची मुख्य शिफारस करण्यात आली होती. ही शिफारस मान्य करण्यात आली असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार आहे. आम्ही जिल्हादंडाधिकाऱ्यांनाही राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे या समितीने ‘केदारनाथ’ सिनेमावर बंदी घालण्यास सर्वानुमते मंजुरी दिली आहे. त्यामुळे या चित्रपटावर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आली आहे,’ असं सतपाल महाराज यांनी स्पष्ट केलं.
https://twitter.com/ANI/status/1070924656285147141
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत