उत्तर प्रदेशमध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’च्या २ संशयित दहशतवाद्यांना अटक

लखनऊ : रायगड माझा वृत्त 

उत्तर प्रदेशमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'च्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक

उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दोघांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी ही कारवाई केली. देवबंदस्थित एका वसतिगृहात ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी शाहनवज अहमद तेली आणि आकिब या दोघांना ताब्यात घेतले. शाहनवाज हा कुलगाम आणि आकिब हा पुलवामा येथील रहिवासी आहे. हे दोघे जैश-ए-मोहम्मद या संघटनेत तरुणांना भरती करण्याचे काम करत असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहनवाज हा जैश-ए-मोहम्मदचा सक्रिय सदस्य आहे. तो उत्तर प्रदेशात नव्या तरुणांची भरती करण्यासाठी आला होता. त्यांच्याकडून ३२ एमएमची  दोन पिस्तूल आणि काडतुसेही जप्त करण्यात आली. यापैकी शाहनवाज हा बॉम्ब तयार करण्यात तज्ज्ञ असल्याचीही माहिती तपासातून समोर आली आहे. या संशयितांच्या फोनमधून ‘जैश’शी संबंधित व्हिडिओ आणि फोटो मिळाले आहेत. त्यांचा संबंध ‘जैश’शी असू शकतो, असा एटीएसला संशय आहे. पोलिसांनी या दोघांनाही न्यायालयात हजर केले असून पोलीस कोठडीची मागणी केली आहे. त्यामुळे या दोघांची अधिक चौकशी करता येईल. जेणेकरून त्यांचे उद्दिष्ट आणि त्यांना आर्थिक पाठबळ कुठून मिळत होते, हे जाणून घेता येईल, असे पोलिसांनी सांगितले.

१४ फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सीआरपीएफच्या ताफ्यातील गाडीवर नेऊन आदळले होते. यामध्ये ४० भारतीय जवान शहीद झाले होते. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत