उदयनराजेंकडून भिडे गुरुजींची पाठराखण

रायगड माझा
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले हे भिडे गुरुजींच्या पाठिशी उभे राहिलेत.
‘भिडे गुरुजी हे वडीलधारी व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. भीमा कोरेगाव येथे जे घडलं त्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही आणि जे त्यांच्याविरुद्ध बोलताहेत त्यांची त्यांना बोलायची लायकी नाही’, असं उदयनराजेंनी आपल्या शैलीत खडसावलं. भिडे गुरुजींशी आपण फोनवर बोललो, तेव्हा या सगळ्या प्रकरणावर बोलताना त्यांना रडूच आलं. या प्रकाराची आपला काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं, असंही उदयनराजेंनी नमूद केलं. मिलिंद एकबोटे हेही आपले मित्र असल्याचं ते म्हणाले.
तसेच, मी कधीच जात-पात मानत नाही. काही राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी जात-पात निर्माण केलीय. आता निवडणुका आल्यानं हे सगळं सुरू झालंय. हा सगळा वाद अस्वस्थ करणारा आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. कारण, हे जर असंच सुरू राहिलं तर राज्याचेच नव्हे तर देशाचे तुकडे होतील, असं उदयनराजेंनी निक्षून सांगितलं. देशाचे तुकडे बघण्यापेक्षा मी मरण पत्करेन, असंही ते म्हणाले. स्वराज्यासाठी त्याग करणारे शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे श्रेष्ठ होते. त्यांचाही मान ठेवणार नसाल तर आपली लायकी काय आहे?, असा सवालही त्यांनी केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत