उदयनराजेंचा फलटणमध्ये प्लॅन बी

विधानसभेच्या रिंगणात संदीपभाऊ शिंदेंना उतरविणार ?

 

सातारा:रायगड माझा 

उदयनराजेंनी फलटणमध्ये जावून रामराजे विरोधकांना तुमच्यापैकी एक जण उभा रहा असे आवाहन केल्यानंतर त्यांनी प्लॅन बी तयार केला असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. खा.उदयनराजेंनी आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघामध्ये पर्याय निर्माण केले असून त्यापैकीच फलटण विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हापरिषद सदस्य संदिपभाऊ शिंदे यांना उतरविण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. दरम्यान, याबाबत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खा.उदयनराजेंनी आदेश दिल्यास पुर्ण ताकदीने निवडणूकीत उतरण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट केले.


खा.उदयनराजे यांनी यापुर्वी सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात अमित कदम यांना उतरविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता फलटणमध्ये संदिपभाऊ शिंदे यांना उतरविण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. कोंडवे, ता. सातारा येथील संदिपभाऊ शिंदे यांनी दहा वर्षापुर्वी रिपाइं युथ जिल्हाध्यक्षपदाबरोबर खा.उदयनराजे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. मात्र, सन. 2011 च्या जिल्हापरिषद निवडणूकीत शिंदे यांनी रिपाइंचा राजीनामा देत खा.उदयनराजे गटाच्यावतीने राष्ट्रवादीकडून कोंडवे गटातून निवडणूक लढविली. त्या निवडणूकीत विजयी झाल्यानंतर शिंदे खऱ्या अर्थाने राजकीय प्रवाहात सामील झाले. पुढे सन.2014 च्या लोकसभा तसेच दिड वर्षापुर्वी झालेल्या सातारा नगरपा लिकेच्या निवडणूकीत शिंदे यांनी खा.उदयनराजे व सातारा विकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. तदनंतर दोन वर्षापुर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या निवडणूकी दरम्यान शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच पत्नी रेश्‍माताई शिंदे यांना वनवासवाडी जिल्हा परिषदगटातून निवडणुकीत उभा केले. या निवडणुकीत खा.उदयनराजे यांनी त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला व शिंदे या निवडणूकीत निवडून आल्या. त्यानंतर मागील दोन वर्षापासून संदिपभाऊ शिंदे यांचा खा.उदयनराजे व भाजप पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग असल्याचे दिसून आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर नुकतेच खा.उदयनराजे यांनी फलटणमध्ये रामराजे विरोधकांना, तुमच्या पैकी एक जण सक्षमपणे उभा रहा असे सांगत आपली ताकद पाठीमागे उभा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर विरोधकांकडून जाहीररित्या कोणताही सकारात्मक प्रतिसाद अद्याप आलेला नाही. या पार्श्वभूमीवर खा.उदयनराजे यांनी प्लॅन बी तयार ठेवत संदिपभाऊ शिंदे यांना उतरविण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. शिंदे यांची राजकीय पार्श्वभूमी व पाठबळ तसेच फलटण शहरातील मलठणमध्ये त्यांचे असलेले आजोळ आणि मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या कोरेगाव उत्तरमधील जनसंपर्क या जमेच्या बाजूंवर शिंदे येत्या निवडणूकीमध्ये फलटणच्या रणांगणात उतरण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

जिल्हापरिषद सदस्य ते आमदार
सातारा जिल्हा परिषद सदस्यांमधून आमदार होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, सन.2009 च्या विधानसभा निवडणूकीत आ.जयकुमार गोरे यांच्यानंतर अद्याप एक ही जिल्हापरिषद सदस्य आमदार होवू शकलेले नाहीत. मात्र, येत्या विधानसभा निवडणूकीत आजी व माजी जिल्हापरिषद सदस्य असलेले महेश शिंदे यांची कोरेगावातून, अनिल देसाई यांची माण-खटावमधून, दिपक पवार व अमित कदम यांची सातारा-जावलीतून, मनोज घोरपडे यांची कराड-उत्तरमधून व आता संदिपभाऊ शिंदे यांची फलटणमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत