उदयनराजेंचे नक्की काय करायचे? राष्ट्रवादीच्या प्रमुख आमदारांची शरद पवारांसोबत बैठक

सातारा : रायगड माझा वृत्त 

सातारा जिल्ह्यातील खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे इतर आमदार यांच्यातील वादाचा पुढील टप्पा आज बारामतीत पार पडला. राष्ट्रवादीच्या प्रमुख आमदारांची शरद पवारांसोबत बैठक झाल्याने उदयनराजेंचे नक्की काय करायचे, यावर चर्चा झाल्याचा अंदाज आहे.

सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार हे आज स्पष्ट झालंय. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख आमदारांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी आज भेट घेतली.  या बैठकीत पुढील राजकीयरणनीतीविषयी चर्चा झाल्याचं समजतंय.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, बाळासाहेब पाटील हे या बैठकीस उपस्थित होते. बैठकीचे स्वरुप विचारात घेता आगामी राजकीय आडाखे काय आखायचे याचीच चर्चा झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.  आज सकाळी अकराच्या सुमारास सर्वच आमदार गोविंदबाग इथं उपस्थित झाले. ही सभा गोपनीय असल्याने कोणालाच या बाबत काहीच माहिती देण्यात आली नव्हती.

विशेष म्हणजे, मागील शनिवारी पक्षाचे खासदार उदयनराजे यांनी साताऱ्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर फसवाफसवी करू नका, नाहीतर आम्हालाही कळतं, असं त्यांनी विधान केलं होतं. तर शरद पवार यांनी उदयनराजे यांचाबाबत बोलण्याचे टाळले होते. त्यांनी माझ्याकडून भेटीची वेळ मागितली आहे. साताऱ्यातील भाकरी करपली आहे या प्रश्नाला त्यांनी नाही म्हणून उत्तर दिले आणि अजून मी तव्यापर्यंत पोहचलो नाही असं म्हणत पवारांनी उदयनराजेंच्या उमेदवारीच्या प्रश्नाला बगल दिली होती.

त्यामुळे आज या पार्श्वभूमीवर बारामतीत सातारा जिल्ह्यातील प्रमुख आमदारांची झालेली बैठक राजकीय दृष्टया अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत