उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध

Udayanraje-Bhosale

सातारा : रायगड माझा वृत्त

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या काही समर्थकांनी आज थेट बारामती गाठत खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांचे काम न करण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांना स्पष्ट सांगून टाकला. त्यामुळे खासदार उदयनराजे यांच्या विरोधातील राष्ट्रवादी अंतर्गत मोर्चेबांधणीने पुन्हा धार पकडल्याचे मानले जात आहे. आजच्या या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका-एका मतदारसंघाचा तिढा सोडवून प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्याच्या मार्गावर आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्वत:च्या उमेदवारीतून त्यांनी माढ्याचा मतदारसंघ सुरक्षित केला. कोल्हापूरच्या उमेदवारीबाबत त्यांनी भूमिका जाहीर केली आहे; परंतु साताऱ्याबाबत त्यांनी अद्याप थेट निर्णय जाहीर केलेला नाही.

जिल्ह्यातील आमदारांचा उदयनराजेंना असलेला विरोध त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे उदयनराजेंना होणारा विरोध दूर करण्यासाठी त्यांनी स्वत: काही पावले टाकली. त्यातून उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजेंना एकाच गाडीत त्यांनी बसविण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या या प्रयत्नानंतरही जिल्ह्यात अद्याप उदयनराजेंच्या भूमिकेबाबत अद्याप सकारात्मक आलेली दिसत नाही. शरद पवार माढ्यात उभे राहण्याची चर्चा सुरू असतानाच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी श्री. पवार यांना साताऱ्यातून उभे राहण्याचे आमत्रंण दिले. देशात सर्वाधिक मतांनी विजय करू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. त्यातूनच उदयनराजेंच्या विरोधातील भूमिका स्पष्ट होत होती. त्यामुळे उदयनराजे विरोधातील हालचालींनी पुन्हा उचल खाल्ली.

आज शिवेंद्रसिंहराजेंच्या सातारा तालुक्‍यातून विविध पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बारामतीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी उदयनराजेंनी आजवर केलेल्या पक्षविरोधी कृतींचा, घेतलेल्या भूमिकांचा पाढा वाचला. उदयनराजेंच्या उमेदवारीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्हाला उदयनराजेंनी आतापर्यंत विरोधच केला.

आम्हाला संघर्ष करून पदे घ्यावी लागली. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली, तरी आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, असे त्यांनी पवार यांना स्पष्ट शब्दांत सांगितले. इतकेच काय शिवेंद्रसिंहराजेंनी काम केले, त्यांनी काम करण्यास सांगितले तरी आम्ही उदयनराजेंचे काम करणार नाही, असे परखडपणे सांगितले. या शिष्टमंडळामध्ये अजिंक्‍यताराचे माजी संचालक लालासाहेब पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सदस्य राजू भोसले, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, सतीश चव्हाण व इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे साताऱ्याच्या उमेदवारीबाबत पक्षाध्यक्षांसमोर पुन्हा पेच निर्माण करण्याचे प्रयत्न दिसत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत