उद्धव ठाकरेंच्या भेटीला अमित शाह मातोश्रीवर येणार!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

पालघर पोटनिवडणुकीत आमची ताकद दाखवल्याने अनेकांना धडकी भरली आहे, आणि त्यामुळेच आता चार वर्षांनी अमित शाह यांना मातोश्रीवर यावंस वाटतंय”, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह बुधवारी मुंबईत येणार आहेत. या भेटीदरम्यान ते ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं वृत्त आहे. संध्याकाळी सातच्या आसपास उद्धव ठाकरे आणि अमित शहा एकमेकांना भेटतील. या भेटीच्या माध्यमातून भाजपाने एकप्रकारे युतीच्या टाळीसाठी हात पुढे केल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेनेनं ताकद दाखवल्यानंतर अमित शहांना मातोश्रीवर यावसं वाटतंय, अशी बोचरी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

संग्रहित छायाचित्र

”केंद्रामध्ये सत्तेत येऊन ४ वर्ष झाली तोपर्यंत शाह यांना मातोश्रीवर यावंस वाटलं नाही, पण आता भाजपाचे सर्व मित्रपक्ष त्यांना सोडून चाललेत, देशातील राजकारण बदलतंय, भाजपविरोधात जनतेमध्ये राग वाढतोय. त्यातच पालघरमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवून दाखवली. आमचा निसटता पराभव झाला असेल. पण आमची मतं पाहून अनेकांना धडकी भरली आहे. जिथे निवडणूक कधी लढवली नव्हती, तिथे लाख लाख मतं मिळाली . पालघर पोटनिवडणुकीत आमची ताकद दाखवल्याने अनेकांना धडकी भरली आहे, आणि त्यामुळेच आता चार वर्षांनी अमित शाह यांना मातोश्रीवर यावंस वाटतंय”, असं संजय राऊत म्हणाले.

नुकत्याच झालेल्या पालघर पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांमधील संघर्ष शिगेला पोहोचला होता. यानंतर उद्धव ठाकरेंनी भविष्यात भाजपाशी युती करणार नाही, असा निर्धार केला होता. शिवसेनेने हा निर्णय अंमलात आणल्यास भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर 2019 च्या निवडणुकांआधी युतीसाठी अमित शाहांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत