उद्धव ठाकरेंनी माझा एकही फोन घेतला नाही : फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र News 24 वृत्त 

निवडणुकांचे निकालानंतर शिवसेनेशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण शिवसेनेनेच आमच्याशी चर्चा करणं थांबवलं, असं सांगतानाच मी स्वत: राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि एका पक्षाचा नेता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेकवेळा फोन केले. पण उद्धव ठाकरे यांनी माझा एकही फोन घेतला नाही, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत  केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. दुपारी साडे चार वाजता राजभवनात जाऊन फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे राजीनामा सुपुर्द केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्विकारल्याचं सांगितलं. निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य आमच्यासाठी धक्कादायक होतं. कारण महायुतीला जनतेने मतदान केलं होतं. महायुती म्हणून आम्ही निवडून आलो होतो. असं असताना उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असं का म्हटले? हा आमच्यासमोर प्रश्न होता. त्यानंतर मी संवाद साधण्यासाठी मी स्वत: उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. पण त्यांनी माझेही फोन घेतले नाही, असा खुलासा फडणवीस यांनी केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत