उन्नत प्रकल्पाची ‘उन्नती’;सीएसएमटी-पनवेल उन्नत रेल्वेप्रकल्प अखेर मार्गी

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल उन्नत प्रकल्पास नव्याने वेग मिळत आहे. या प्रकल्पास आवश्यक असणाऱ्या भूसंपादनाच्या अनुषंगाने मोजणी केली जाणार आहे. तुर्भे, नेरुळ येथील जमीन प्रकल्पाचा भाग ठरणार असल्याने तिथे मोजणीचे काम होणार असून, ते दोन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सीएसएमटी ते पनवेल हे अंतर सुमारे ७५ मिनिटांऐवजी अवघ्या पाऊण तासात पार करणारी ही मार्गिका आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडण्याचे प्रमुख साधन ठरणार आहे. हा प्रकल्प लोकलसेवेत कायापालट घडवण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई रेल्वे विकास महांमडळाकडून (एमआरव्हीसी) हा प्रकल्प राबवला जाणार असून, त्यासाठी सुमारे १२ हजार कोटींचा निधी अपेक्षित आहे. २००९पासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या या प्रकल्पासाठी तुर्भे, नेरुळ येथील जमिनीचा भाग समाविष्ट होणार आहे. या जमिनीच्या पाहणीसंदर्भात ठाणे भूसंपादन विभागाने भूमीअभिलेखाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

सीएसएमटी ते पनवेल उन्नत मार्गासाठी २०१२मध्ये प्रथम तांत्रिक अहवाल तयार करण्यात आला. मुंबई शहर वाहतूक प्रकल्पात (एमयूटीपी-३) समावेश झाला असून प्रत्यक्ष कामास अजून काही कालावधी अपेक्षित आहे. ‘एमयूटीपी-३’च्या एकूण आराखड्यास रेल्वे बोर्डासह केंद्रीय मंत्रिमंडळाचीही मंजुरी शिल्लक आहे. त्यानंतर हे काम वेग घेणार आहे. या स्थितीत उन्नत प्रकल्प तुर्भे, नेरुळ येथून जाणार असून त्यातील सर्वंकष माहिती आदी गोष्टी लक्षात घेतल्या जातील. त्यादृष्टीने संयुक्त मोजणी गरजेची आहे. या मोजणीतून जागेची नेमकी माहिती हाती येईल, असे सांगण्यात येते. त्यात जमीन, वृक्ष, सरकारी-खासगी जमीन आदींचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी साधारण दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यात भूमापनाप्रमाणेच मूल्यांकनाचाही भागही जोडला जाणार असल्याचेही सांगितले जाते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत