उपजिल्हाधिकारी मारहाण प्रकरणी आमदार सुरेशभाऊ लाड यांची निर्दोष मुक्तता 

कर्जत : अजय गायकवाड
          पालघर येथील उपजिल्हाधिकारी आणि रिलायन्स गॅस पाईपलाईनसाठी शासनाने नियुक्त केलेले सक्षम प्राधिकारी अभय करगुटकर यांना कर्जतचे आमदार सुरेशभाऊ  लाड यांनी मारहाण केल्याप्रकरणी कर्जत येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल आज 21 फेब्रुवारी लागला. यामुळे सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा आरोपातून न्यायालयाने आमदार सुरेश लाड यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
              ११ऑगस्ट २०१६  रोजी रिलायन्स गॅस लाईनचे अधिकारी आणि शासनाने नियुक्त केलेले सक्षम प्राधिकारी अभय करगुटकर हे जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारातील खाजगी कार्यालयात बसले होते. संबंधित अधिकारी कोणाचेही ऐकून न घेता शेतकऱ्यांच्या जमिनी कोणत्याही परवानगी विना घेण्याचा सपाटा लावला होता. अनेक शेतकऱ्यांनी याबाबतच्या तक्रारी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांच्याकडे केल्या होत्या. त्याची माहिती घेण्यासाठी आमदार सुरेश लाड कर्जत तहसील कार्यालयात पोहचले. त्या ठिकाणी त्यावेळी उपस्थित असलेले  उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांनी लोकप्रतिनिधी आमदार लाड यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संतापलेल्या आमदार लाड यांनी उपजिल्हाधिकारी व रिलायन्सच्या काही अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात  व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर १७ ऑगस्ट रोजी रात्री अभय करगुटकर यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.कर्जत पोलिस ठाण्यात आमदार सुरेश लाड यांच्यावर १३७/२०१६ भादवि कलम ३५३ , ३६३, ३३२, ३४१, ३२३, ५०६, १९६  या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. सरकारी अधिकाऱ्याला सरकारी कामापासून वंचित ठेवणे, लोकसेवकाला त्यांचे कर्तव्य पार पडण्यापासून परावृत्त करणे आणि अपहरण करणे तसेच मारहाण, धमकी  करण्याचे आरोप लाड यांच्यावर ठेवण्यात आले होते. याबाबत कर्जत पोलिसांनी आमदार लाड यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
          यावर न्यायालयाने त्यांची बाजू समजून घेऊन आमदार लाड यांना २५ हजार रुपयांच्या सॉल्व्हनसी जामिनावर मुक्तता केली होती. सदर प्रकरणाची  गेली चार महिने कर्जत न्यायालयात सुनावणी सुरू होती.  कर्जत न्यायालयात चाललेल्या खटल्यात सरकारी पक्षाने कुढलाही पुरावा न्यायालयापुढे आणला नाही,जेणे करून आमदार लाड यांनी त्यादिवशी उपजिल्हाधिकारी करगुटकर यांच्या सोबत गैर वर्तन केले, हात उचलला अश्या प्रकारचा कोणताही पुरावा कोर्टापुढे सादर झाला नाही. त्याच बरोबर साक्षीदारांच्या जबाबामध्ये तफावत आढळून आल्याने दिसून आले.
            स्विकृत दर्शनी आमदार लाड यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न होत नाही. वकील अनिकेत निकम यांनी बचावाचा युक्तिवाद करताना न्यायालयासमोर सांगितले तथाकथित  इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स , सी सी टीव्ही फुटेज च्या संदर्भातील ६५ (ब ) चे प्रमाण पत्र हे दबावाने मिळवले आहे अशी कबुली सरकारच्या साक्षीदाराने उलट तपासणीत दिली.वकील अनिकेत निकम यांनी सर्वच्च न्यायालयाचे न्यायपत्र न्यायालयात दाखल केले व न्यायालयाला दाखवून दिले  की फिर्यादीने फिर्याद दाखल करताना ६ दिवसांचा विलंब केला आहे व या संदर्भात कुढलेही संयुक्तीक कारण सरकार पक्षाने न्यायालया समोर सिद्ध केले नाही त्यामुळे फिर्यादी यांनी राजकीय द्वेषापोटी खटला दाखल केला आहे
            कर्जत न्यायलायात प्रथम वर्ग न्यायाधीश एम. व्ही. तोकले यांच्या समोर खटला चालला. आमदार सुरेश लाड यांच्या वतीने वकील अनिकेत उज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यांना कोर्टाच्या  कामात वकील विलास लाड व वकील राजेंद्र निगुडकर यांनी सहकार्य केले .या खटल्यात उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर, कर्जत पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, रिलायन्स मध्ये काम करणारे निवृत्त तहसीलदार महेंद्र पाटील, रिलायन्सचे अधिकारी, पंच असे १४ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारच्या वतीने सरकारी वकील के.व्ही. सोनावणे यांनी काम पाहिले.
आमदार सुरेश लाड यांनी उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांच्या सोबत गैर वर्तन केले, हात उचलला अश्या प्रकारचा कोणताही पुरावा सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केला नाही तसेच साक्षीदारांच्या जबाबा मध्ये तफावत आढळून आल्याने न्यायालयाने आमदार सुरेश लाड यांची मारहाण प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे.
-अनिकेत उज्वल निकम,  सुरेशभाऊ  लाड  यांचे वकील
मी लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलो म्हणून माझ्या बाबत वेगळी भूमिका घेण्यात आली व माझ्यावर खटला दाखल करण्यात आला. न्यायालयाने आज जो निर्णय दिला त्याचा मी आदर करतो.
   -सुरेशभाऊ  लाड, आमदार
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत