उपमुख्यमंत्री पदावरुन दुमत; फडणवीसांची शिंदेंना तर, सेनेची देसाईंना पसंती 


(रायगड माझा ऑनलाईन | मुंबई)

सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावरून तिढा निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री कोण, एकनाथ शिंदे की सुभाष देसाई? असा हा तिढा असून, मुख्यमंत्री फडणवीस यांची शिंदे यांना पसंती असून, सेनेला मात्र देसाई हवे आहेत. विशेष म्हणजे हा तिढा निर्माण होण्याचे मुख्य कारण ठरले आहे ते एकेकाळचे सेनेचेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे.

नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेण्यावरून युती सरकारमध्ये आधीच पेच उभा राहिला होता. राणे यांना मंत्रिमंडळात घ्यायचे असल्यास आम्हाला उपमुख्यमंत्री द्या, ही सेनेची मागणी होती. ती फडणवीस यांनी मान्य केली. पण, ही मागणी पूर्ण करताना मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्या नावाला प्राधान्य दिले. सेना मात्र वरिष्ठ नेते देसाई यांच्या नावासाठी आग्रही आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

सेनेच्या मंत्र्यांपैकी शिंदे हे फडणवीस यांचे सर्वांत लाडके मंत्री आहेत. शिंदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (उपक्रम वगळून) कामावर ते खूश असून, त्यांना सर्व प्रकारची मुभा त्यांनी दिली आहे. सेनेकडे असलेल्या उद्योग, पर्यावरण, परिवहन, आरोग्य या खात्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचा जसा हस्तक्षेप असतो, तसा ते शिंदे यांच्या खात्यात करताना कधीच दिसले नाहीत. समृद्धी महामार्ग या फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात शिंदे यांना त्यांनी समाविष्ट केले आहे. खास बात म्हणजे जमीन अधिग्रहणाची अनेक प्रकरणे सोडण्यासाठी फडणवीस यांनी शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती खुबीने सोडवल्यामुळे मुख्यमंत्री शिंदेशाहीवर खूप खुश असल्याचे समजते.

शिंदे उपमुख्यमंत्री झाल्यास आपल्याला काही अडचण येणार नाही. पण, देसाई यांचे तसे नाही. ते प्रत्येक निर्णय ‘मातोश्री’शी सल्लामसलत केल्याशिवाय घेणार नाहीत आणि ते आपल्याला अडचणीचे ठरतील, असा त्यांचा कयास आहे. तर राणे यांच्यामुळे हात पोळून घेतलेल्या सेनेने यापुढे कुठल्याही नेत्याला फार मोठे करायचे नाही, असे ठरवले आहे. या घडीला सेनेत सर्वात प्रभावी नेता म्हणून शिंदे यांचे नाव घेतले जाते. सेनेच्या आमदारांचाही मोठा गटही त्यांच्यामागे आहे. शिंदे यांना उपमुख्यमंत्री केल्यास ते भविष्यात डोईजड होतील, ही भीती मातोश्रीला सतावत आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत