उमेदवारीसाठी उदयनराजे आणि रामराजे यांच्यात चुरस

मुंबई : रायगड माझा वृत्त 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, याबद्दल खल सुरू आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याऐवजी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी द्या, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे. तर, विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनीही आपण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे पक्षाला सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये संभाव्य उमेदवार कोण, याबद्दल चाचपणी करण्यासाठी आढावा बैठका सुरू आहेत. रविवारी सातारा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली. मेट्रोमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय दुसरीकडे हलविण्यात आले आहे. परंतु या कार्यालयाचा पत्ता खासदार उदयनराजे भोसले यांना माहीत नव्हता. त्यामुळे त्यांना नवीन कार्यालय शोधण्यात खूप वेळ गेला. तेवढ्या वेळात सातारा लोकसभा जागेसंबंधीची आढावा बैठक संपली. त्यानंतर उदयनराजे भोसले तेथे पोहोचले. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी तेथील पक्षाच्या आमदारांनी फिल्डिंग लावली आहे. तसा विरोधही त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नोंदविला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले यांची वक्तव्ये राष्ट्रवादीला अडचणीची ठरत आहेत. त्यांचे बिनधास्त बोलणे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना खटकत आहे. तसेच उदयनराजे भोसले हे फारसे कोणाला जुमानत नाहीत, त्यामुळे पक्षात त्यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत रामराजे निंबाळकर यांचे नाव पुढे आले आहे. ही आढावा बैठक संपल्यानंतर उदयनराजे भोसले या कार्यालयात पोहचले. उदयनराजे भोसले यांनी आपण साताऱ्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. त्यांना अन्य पक्षही साताऱ्यातून तिकीट देण्यास उत्सुक आहेत.

”सातारा लोकसभेबाबत पक्षाध्यक्ष पवार जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. माझ्या उमेदवारीला विरोध करणाऱ्यांची ताकद किती हे पाहिले पाहिजे. कोणीही विरोध केला तरीही माझी जिंकून येण्याची ताकद आहे. गेल्या निवडणुकीचे मताधिक्य पाहिले तर सर्वात जास्त मते मला मिळाली होती. तेवढी मते मिळवणारा उमेदवार असेल तर त्याला संधी द्या.” – खासदार उदयनराजे भोसले

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत