उरण शहरातील हॉटेलमध्ये झालेल्या स्फोटामुळे 5 जण जखमी नवी मुंबईत उपचार सुरू

उरण : विरेश मोडखरकर

रायगड जिल्ह्यातील उरण शहरातील हॉटेलमध्ये झालेल्या स्फोटामध्ये 5 जण जखमी झाले आहेत. गॅस गळती झाल्याने हा स्फोट झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून, हा स्फोट इतका मोठा होता की यावेळी हॉटेल मधील सर्व सामान बाहेर फेकले गेले होते.

बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उरण शहरातील बिमला तलावनजीक असलेल्या मोझिला कॅफे हॉटेलमध्ये शटर उघडताच अचानक स्फोट झाला. यावेळी , हॉटेलचे शटर उघडण्यासाठी गेलेला कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. तर, अचानक झालेल्या या स्फोटामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षेतील प्रवासी आणि मोटारसायकलस्वार जखमी झाले. स्फोटामुळे पेटलेल्या आगीच्या लोळामध्ये रिक्षेतील चालक आणि महिला भाजले असून रिक्षाचालकाच्या हाताला दुखापत झाली आहे. सकाळी झालेल्या या स्फोटामुळे इमारतीला हादरा बसल्याने इमारतीतील रहिवासी देखील भयभीत झाले आहेत. स्फोटातील जखमींना नवीमुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या हॉटेलचे मालक प्रकाश भाईचंद ठक्कर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

उरणमध्ये मोझिला कॅफेमध्ये झालेल्या अपघाताने सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याच उपाय योजना नसल्याचे समोर आले आहे. यामुळे उरणमधील इतर कॅफे आणि हॉटेलमध्ये असुरक्षेबाबत खबरदारी घेण्यात आली आहे का? हा सवाल उपस्थित होत आहे. तर खुलेआम रस्त्यांवर गॅस सिलेंडरचा वापर करून उघड्यावर पदार्थ तळणाऱ्या हातगाड्यांवर या अनुषंगाने कारवाई होणार का असा सवालही केला जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत