प्रमुख महामंडळावर पत्रकाराची नियुक्ती : योगेश जाधव पत्रकार राज्यस्तरीय अधिस्वीकृती समितीचेही सदस्य
मुंबई : रायगड माझा
उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी दै.‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती केली. मंडळाच्या अध्यक्षांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. डॉ. जाधव हे लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी परदेश दौर्यावर जाण्यापूर्वी या नियुक्तीला मान्यता दिली होती. याचबरोबर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खा. संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील सहा महसुली विभागांपैकी तीन महसुली विभाग हे या मंडळाच्या कार्यक्षेत्रात येत असून, त्यामध्ये पुणे, नाशिक व कोकण या विभागीय आयुक्त कार्यालयांचा समावेश आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर हे पुणे विभागातील, मुंबई, ठाणे, रायगड व पालघर हे कोकण विभागातील, तर अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदूरबार या नाशिक विभागातील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. मुंबईमध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत.
राज्याच्या राजकारणावर गेली अनेक वर्षे आपला प्रभाव टिकवून ठेवणारे हे सर्व जिल्हे आहेत. या जिल्ह्यांतील विकास कामांना अधिक न्याय मिळावा आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, कोकण व उत्तर महाराष्ट्राचा विकास व्हावा, यासाठी डॉ. योगेश जाधव यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
डॉ. योगेश जाधव हे दै.‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक पदाबरोबरच अन्य सामाजिक संस्थांची जबाबदारी पार पाडत आहेत. त्याचबरोबर विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सडेतोड भूमिका घेऊन त्यामध्ये सहभाग घेतला आहे. पत्रकारांसाठी राज्यशासनाने नियुक्त केलेय अधिस्वीकृतीसामितीचेही सदस्य आहेत.श्री जाधव याच्या रूपाने एका तरुण पत्रकाराला या महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
डॉ. योगेश जाधव यांनी कोल्हापूरच्या सेंट झेव्हियर्स हायस्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. ते शिवाजी विद्यापीठाचे पदवीधर आहेत. डॉ. जाधव यांनी पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतली आहे, तर मुंबई विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशनमधून डॉक्टरेट मिळविली आहे.
त्यांच्या संशोधनाला आऊटस्टँडिंग रिसर्च अॅवॉर्ड मिळाले आहे. ख्यातनाम अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठात त्यांना समारंभपूर्वक ते प्रदान करण्यात आले.
डॉ. योगेश जाधव हे राष्ट्रीय पातळीवरील नेमबाज आहेत. आपल्या महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी अखिल भारतीय स्तरावर जी. बी. मावळंकर सुवर्णपदकावर आपले नाव कोरून कोल्हापूरच्या नेमबाजीचा लौकिक अखिल भारतीय पातळीवर नेण्याचे काम केले आहे.
राज्यात उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशी तीन वैधानिक विकास मंडळे कार्यरत आहेत. या मंडळांचे काम थेट राज्यपालांच्या नियंत्रणाखाली चालते. त्याचे निधी वाटप आणि मंडळाच्या कामकाजावर राज्यपालांची देखरेख असते.
विदर्भ विकास मंडळ अध्यक्षपदी चैनसुख संचेती
विदर्भ विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आ. चैनसुख संचेती, तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.