‘एकच लक्ष नगराध्यक्ष’ भाजपाचे कर्जत मध्ये बिगुल

कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगारे झाडू लागले आहेत. एकीकडे  शिवसेना भाजप युतीसाठी काहीजण प्रयत्नशील असताना  भाजपने आज  एकच लक्ष  नगराध्यक्ष असे फलक शहरात झळकावून आपला इरादा स्पष्ट केला आहे. 

रायगड माझा वृत्त

कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.  कर्जत मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात. भारतीय जनता पक्षाने  आतापर्यंत कायम कोणाच्या  तरी सोबतीने कर्जतची निवडणूक लढली आहे. भाजपाने यापूर्वीची निवडणूक  शिवसेनेच्या सोबतीने लढली होती. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. भारतीय जनता पार्टी राज्यात आणि केंद्रात क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात देखील भाजपाला चांगले यश मिळाले आहे. या पार्शवभूमीवर कर्जत विधानसभा मतदारसंघात भाजपाने  तयारी सुरु केली आहे. विधानसभेपूर्वी होणारी कर्जत नगर परिषदेची निवडणूक म्हणूनच सर्व पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे.

कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण पूरक न पडल्याने शिवसेनेने युतीसाठी अनुकूल असल्याचे वातावरण निर्माण केले आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना अत्यंत आग्रही आहे. मात्र आता भाजपाने कर्जतच्या नगराध्यक्षपदावर दावा करणारे फलक झळकावून  शिवसेनेची कोंडी केली आहे. कर्जतच्या राजकीय सारीपाटावर भाजपाने फलक लावून पहिली चाल खेळली असून  त्यावर आता  शिवसेनेची काय प्रतिक्रिया  येते  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत