एकनाथ खडसेंच्या कार्यालयातून भाजपचे पोस्टर हटले! खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी जवळ

नागपूर: महाराष्ट्र News 24 वृत्त

विधानसभा निवडणुकीत तिकीटही न मिळवू शकलेले व निवडणुकीत मुलीचा पराभव झाल्यामुळं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर प्रचंड नाराज आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत शरद पवार व मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षावर टीका केली होती. बहुजनांचा पक्ष आता मुठभरांच्या हाती गेल्याचा आरोप त्यांनी केला होता. माझा काहीही भरवसा नाही. मी कधीही कुठेही जाऊ शकतो, असंही ते म्हणाले होते. त्यामुळं त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला जोर आला होता.

नागपूर येथे काल रात्री त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यातच त्यांच्या मुक्ताईनगर येथील कार्यालयातून भाजप व मोदींचे फोटो हटवले गेल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. ‘माझा काही भरवसा नाही. मी कधीही भाजप सोडू शकतो,’ असं वक्तव्य करून खळबळ उडवून देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी जवळ गेल्याचं बोललं जात आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे नागपुरात दाखल होताच काल एकनाथ खडसेही तिथं पोहोचले. ‘मी सध्या कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी भाजपचाच कार्यकर्ता आहे. तेव्हा माझी कुणीही मनधरणी करायची गरज नाही,’ असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं होतं. मात्र, काल रात्री त्यांची शरद पवार यांच्याशी गुप्त भेट झाल्याचे समजते. या भेटीत नेमकं काय झालं, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, खडसे वेगळा विचार करत असल्याचं बोललं जात आहे. मुक्ताईनगर येथील त्यांच्या कार्यालयातून भाजपचे पोस्टर हटविण्यात आलं आहे. त्यामुळं या चर्चेला बळकटी मिळाली आहे. ते नेमकं काय करणार, याकडं आता लक्ष लागलं आहे.

भाजपचा सावध पवित्रा

एकनाथ खडसे यांच्या या भूमिकेवर भाजपनं सावध पवित्रा घेतला आहे. खडसे हे भाजपचे नेते आहेत. त्यांच्यामुळे पक्षाचा विस्तार झाला, याबाबत दुमत नाही. त्यांच्या नेतृत्वात मी व देवेंद्र फडणवीस यांनी देखील काम केलंय. त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. प्रतिकूल परिस्थितीतही कार्य करत राहणे, हीच भाजपची शिकवण आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत