एकनाथ शिंदेच्या उपस्थित ठाण्यात रात्रभर खड्डे भरणी युद्धपातळीवर

ठाणे : रायगड माझा वृत्त 

खड्ड्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि श्री गणेशाचे आगमन खड्डेमुक्त रस्त्यांतून होण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली असून कालपासून रात्र-रात्रभर खड्डे भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पहाटे ३ वाजेपर्यंत या कामाची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, वाहतूक पोलिस उपायुक्त अमित काळे, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील खड्डे भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. परंतू संततधार पाऊस आणि अवजड वाहतूक यामुळे परत खड्डे पडत आहेत. ही बाब लक्षात घेवून महापालिकेच्यावतीने दिवसा खड्डे भरताना वाहतूक कोंडी होवून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रात्रीच्यावेळी खड्डे भरण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार कालपासून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रात्रीच्यावेळी रस्त्यावर उतरली असून वाहतूक पोलिस शाखा यांच्या समन्वयातून रात्रीच्यावेळी खड्डे भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे. महत्वाचे म्हणजे शहरामध्ये येणारे रस्ते आणि बाहेर जाणारे रस्ते यावर लक्ष केंद्रीत करण्याबरोबरच शहरातील आतील महत्वाच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे.

यासाठी वरिष्ठ अभियंत्यांची विविध पथके निर्माण करण्यात आली असून त्यांच्या निगरानीखाली खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यातंर्गत काल रात्री आनंदनगर नाका, तीन हात नाता पूल, नितीन कंपनी पूल, कॅसल मिल, मानपाडा जंक्शन, दोस्ती इंपिरिया, ब्रम्हांड, कोलशेत, ढोकाळी नाका, श्रीरंग सोसायटी, एसटी कार्यशाळा, खारटन रोड, मल्हार सिनेमा चौक आदी ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम पहाटे ४ पर्यंत सुरू होते.

या सर्व ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पहाटे ३ पर्यंत पाहणी करून खड्डे बुजविण्याचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे की नाही याची पाहणी केली. यावेळी रस्ते कोणाच्या मालकीचे आहेत हे न पाहता ते दुरूस्त करण्यात यावेत असे आदेश दिले आहेत. यावेळी नगर अभियंता अनिल पाटील, उपायुक्त संदीप माळवी, उपनगर अभियंता कैलाश मुंबईकर, अर्जून अहिरे, राजन खांडपेकर, कार्यकारी अभियंता प्रविण पापळकर, मोहन कलाल, सुधीर गायकवाड, रामदास शिंदे, विकास ढोले आणि सर्व अभियंते उपस्थित होते.

तीन दिवस चालणार ही विशेष मोहिम

शहरातील खड्डे बुजविण्याची विशेष मोहिम तीन दिवस चालणार असून या तीन दिवसात रात्रीच्यावेळी जास्तीत जास्त खड्डे बुजविण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले असून महापालिका आयुक्त स्वत: तीनही रात्री या कामाची पाहणी करणार आहेत.

पालकमंत्र्यांनी केले आयुक्तांचे कौतुक

खड्डे बुजविण्याच्या बाबतीत ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल करीत असलेल्या कामाबाबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. विशेष म्हणजे महापालिकेच्या मालकीचे रस्ते नसतानाही केवळ वाहतुक कोंडी होवू नये व नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून ते ज्या पद्धतीने काम करीत आहेत ते कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत