एक डिसेंबरला जल्लोष करा – फडणवीस

नेवासे : रायगड माझा वृत्त 

“मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आजच (गुरुवार) राज्य सरकारकडे दिला आहे. अहवालाबाबत संवैधानिक कार्यवाही पूर्ण करून नोव्हेंबरअखेर मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व निर्णय आम्ही घेणार आहोत. श्रेयाची लढाई कोणी लढू नका. सध्या आरक्षणासाठी घेराव व आंदोलनाचे इशारे दिले जात आहेत. अरे, आंदोलन कसले करता? सरकार आता मराठा आरक्षणाचा निर्णय घेणार असून, करायचाच असेल, तर एक डिसेंबरला जल्लोष करा,” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय शेतकरी-वारकरी महासंमेलनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत बद्रिनाथ तनपुरे महाराज होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्थानाचे अध्यक्ष अतुल भोसले, उद्धव मंडलिक महाराज आदी या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराजांचा पुतळा पुनर्निर्माण सोहळा व राष्ट्रसंत तनपुरेबाबा मराठाभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, “”मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत कर्जमाफी सुरूच राहील. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची तिजोरी कायम खुली असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन आयोगाची खरी अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. शिवशाहीच्या धर्तीवर राज्यात “जलयुक्त शिवार’ योजना यशस्वीपणे राबविली. आधीच्या सरकारांच्या काळात मूठभर प्रस्थापित झाले, तर ढीगभर बहुजन समाज व शेतकरी मात्र गरीबच राहिला. त्यामुळे विस्थापितांना प्रस्थापित करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे.” महाराष्ट्राचा धर्म आणि संस्कृती वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवली असल्याचे त्यांनी नमूद केले.

पाटील म्हणाले, “”मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारकडे आला असून, कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण दिले जाईल. मुख्यमंत्रीच मराठा समाजाला न्याय देतील.”

शनैश्वर देवस्थानाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष 
आयोजकांनी केलेल्या नियोजनात फक्त मुख्यमंत्री, तनपुरे महाराज, चंद्रकांत पाटील व पालकमंत्री यांचीच भाषणे होती; मात्र पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून आमदार मुरकुटे यांना बोलण्याची संधी देण्यात आली. मुरकुटेंनी नेहमीसारखेच स्थानिक राजकारणासह शनैश्वर देवस्थानाच्या नवीन विश्‍वस्तांचा प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान, पालकमंत्र्यांनीही त्याचा धागा पकडून, शनैश्वर देवस्थानाच्या नवीन विश्वस्त नेमणुकीचा प्रश्न उपस्थित केला. याबाबत मुख्यमंत्री काही तरी घोषणा करतील, अशी सर्वांची अपेक्षा होती; मात्र त्यांनी या दोघांच्याही मागणीकडे दुर्लक्ष केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत