एमआयएम आणि भारिप राज्यातील निवडणुका एकत्र लढणार!

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त 

एमआयएम आणि प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ हे राज्यात युती करुन निवडणुका लढणार आहेत. गांधी जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोबरला औरंगाबादेत जबिंदा लॉन्सवर युतीची पहिली एकत्र सभा होणार आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी याबाबत माहिती दिली.

त्यापूर्वी 2 ऑक्‍टोबरला सकाळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये युतीची पहिली बैठक घेतली जाईल. एमआयएम आणि प्रकाश आंबेडकरांच्या भारिपमध्ये युतीबाबत पुण्यातील प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी दोन मीटिंग झाल्या आहेत.

प्रकाश आंबेडकर या युतीचं नेतृत्व करणार आहेत. ज्यात महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढतील. अहमदनगर महापालिकेत युतीचा पहिला प्रयोग केला जाणार असून भारिप आणि एमआयएम एकत्र लढणार आहेत.

राज्यातील दलित आणि मुस्लिमांची मते एकत्रित करण्याचा प्रयत्न या युतीतून केला जाणार आहे. काँग्रेससह इतर पक्षांनाही याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.एमआयएमचे राज्यात दोन आमदार आहेत. एक इम्तियाज जलील आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे वारिस पठाण हे आमदार आहेत. एमआयएमचे औरंगाबाद महापालिकेत 25 नगरसेवक आहेत. मुस्लीम तरुणांचा मोठ्या प्रमाणावर एमआयएमकडे ओढा आहे. ओवेसी बंधूच्या सभेला लाखोंची गर्दी पाहायला मिळते. या युतीतून आता मतांचं विभाजन टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत