एलइडी मासेमारीस बंदी!

राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय मंत्रालयाचा निर्णय…

अलिबाग : रायगड माझा वृत्त 

देशाच्या सागरी किनारपट्टी भागात केंद्राने प्रकाशझोतातील (एलइडी) मासेमारीस बंदी घातली आहे. आता या पाठोपाठ राज्यानेही राज्याच्या १२ सागरी मैल या राज्याच्या हद्दीत प्रकाशझोताचा वापर करून मासेमारीस तसेच बुलट्रॉलिंग व पेअर पद्धतीच्या मासेमारीस बंदी घातली आहे. ही माहिती सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांनी दिली.

Related image

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौका व त्यांना साहाय्य करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात येईल अशी अधिसूचना राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने जारी केली आहे. केंद्राने देशाच्या सागरी हद्दीत प्रकाशझोतातील मासेमारीस बंदी घातली होती; मात्र राज्याच्या सागरी  हद्दीत अशी बंदी नसल्याने पारंपरिक व प्रकाशझोतातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांमध्ये संघर्ष उफाळून आला होता. या पार्श्‍वभूमीवर केंद्राच्या कृषी आणि किसान मंत्रालय, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन विभागाने राज्यासह राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात किंवा जलधी क्षेत्राबाहेर एलईडी लाइट वापरून मासेमारी करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आवश्‍यक ती उपाययोजना करावी अशा सूचना दिल्या आहेत.

राज्याने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ याच्या कलम ३ नुसार गठित करण्यात आलेल्या सल्लागार समित्यांशी विचार विनिमय करून राज्याच्या सागरी जलधि क्षेत्रात म्हणजेच १२ सागरी मैल क्षेत्रात ट्रॉलिंग किंवा पर्ससीन किंवा गिलनेट किंवा डोलनेट यांचा वापर करणाऱ्या यांत्रिक तसेच यंत्रचलित मासेमारी  नौकांना जनरेटरवर अथवा जनरेटर शिवाय चालणारे बुडीत, पाण्याखाली अथवा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते कृत्रिम एलईडी लाइट, दिवे, माशांना आकर्षित करणारे दिवे किंवा कोणतीही इतर प्रकाश उत्सर्जित करणारी  कृत्रिम उपकरणे यांचा वापर करणे किंवा ती बसविणे  याला प्रतिबंध घातला आहे.

बुल ट्रॉलिंगलाही पायबंद
याचबरोबर राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात १२ सागरी मैल परिसरात बुल, पेअर ट्रॉलिंगद्वारे मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. या आदेशाचे पालन करणाऱ्या  मासेमारी नौका, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्या व आधार, पुरवठा करणाऱ्या संलग्न नौकांवर कारवाई केली जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत