एसटी आंदोलनाबाबत आज निर्णय

मुंबई : रायगड माझा वृत्त

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेकडून आझाद मैदानात मंगळवारपासून उपोषण सुरू करण्यात आले. एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळामध्ये झालेली चर्चा पहिल्या दिवशी निष्पळ ठरली आहे. त्यामुळे आज, बुधवारी पुन्हा त्यावर चर्चा होणार असून त्यातील निष्पत्तीनुसार आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एसटी महामंडळातील अधिकृत कामगार संघटना असलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने मंगळवारपासून उपोषण आंदोलन सुरू केले. त्याचा भाग म्हणून राज्यातील विभागीय कार्यालये, आगारांमध्येही कर्मचाऱ्यांकडून उपोषण केले जाणार आहे. उपोषण सुरू असतानाच एसटी महामंडळ आणि कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाची मंगळवारी बैठक झाली. या चर्चेतून पहिल्या दिवशी ठोस काहीही निष्पन्न झालेले नाही. यासंदर्भात आज, बुधवारी पुन्हा चर्चेची फेरी होईल. या चर्चेतून नेमके काय साध्य होईल, याकडे कामगार संघटनेचे लक्ष लागले आहे. त्यानुसार आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

धनंजय मुंडे यांची हजेरी 
एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या उपोषणास मुंडे यांनी भेट दिली. ते म्हणाले, ‘एसटी कर्मचाऱ्यांना चार हजार ८४९ कोटी रुपयांची ऐतिहासिक पगारवाढ दिल्याची परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा फसवी आहे. या वेतनवाढीचा कर्मचाऱ्यांना अद्याप फायदा मिळालेला नाही.’ दिवाळीपूर्वी ही वेतनवाढ न मिळाल्यास एसटी कर्मचारी राज्य सरकार आणि परिवहनमंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नसल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आझाद मैदानात मंगळवारी दिला. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे स्पष्ट करतानाच मुंडे यांनी सरकारवर टीका केली. परिवहनमंत्री रावते यांनी पगारवाढीची केलेली घोषणाही सरकारच्या इतर घोषणांप्रमाणे फसवी ठरली आहे. कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा मिळालेला नाही. त्यामुळे स्वत: कामगारांच्या खांद्यास खांदा देउन संघर्ष करण्याचे आश्वासन दिले. या वेळी, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, अशोक धात्रक आदी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत