ऐन थंडीत मुंबईत दहा टक्के पाणीकपात

मुंबई : रायगड माझा वृत्त 

संपूर्ण राज्यात दुष्काळाची स्थिती असताना आज गुरुवार, 15 नोव्हेंबरपासून शहर आणि उपनगरातही मुंबईकरांना 10 टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. पुढील वर्षीचा पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीटंचाई भासू नये म्हणून पालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. पाणीपुरवठय़ाच्या वेळेत 15 टक्के कपात तर पाणीपुरवठय़ात 10 टक्के कपात करण्यात आली असून उद्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर, तानसा, विहार, तुलसी, अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा या सात तलावांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्यामुळे पाणीकपात करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या होत्या. 1 नोव्हेंबरला पाणीसाठय़ाचा आढावा घेतल्यानंतर पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा 15 टक्के कमी झाला. त्यामुळे आज प्रशासनाने पाणीकपातीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर माहितीकरिता सादर केला व त्याची अंमलबजावणी उद्या, 15 नोव्हेंबरपासून जाहीर होणार असल्याचे जाहीर केले.

शोक प्रस्तावाच्या आडून पाणी कपात
आज झालेल्या स्थायी समितीमध्ये केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांच्या निधनानिमित्त शोकप्रस्ताव मांडून सभा पूर्ण तहकूब करण्यात आली. मात्र प्रशासनाने सभेच्या आधीच पाणीकपातीचे निवेदन स्थायी समिती सदस्यांना ठेवले. सदस्यांनी या पद्धतीने निवेदन देण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. शोकप्रस्ताव मांडलेला असल्यामुळे या विषयावर चर्चा होऊ शकली नाही. मात्र थोडय़ाच दिवसांनी पाणीसाठय़ाचा पुन्हा अंदाज घेऊन याबाबत प्रशासनाला जाब विचारू, असे आश्वासन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

पुढच्या वर्षी पाऊस लांबल्यास पाणी पाणी करण्याची वेळ येऊ नये म्हणून एकूण पाणीसाठा हा पुढच्या वर्षी 31 जुलै 2019 पर्यंत पुरेल अशा पद्धतीने त्याचे नियोजन करावे लागते. मात्र पाणीसाठा पुरेसा नसल्यामुळे पावसाळय़ात राखीव साठा वापरण्याची वेळ येऊ शकते. मात्र तसे होऊ नये म्हणून ही पाणीकपात करण्यात आली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

अशी आहे कपात
– पाणीपुरवठय़ात 10 टक्के पाणीकपात करण्यात आली असून पाणीपुरवठय़ाच्या वेळेत 15 टक्के कपात करण्यात येणार आहे. ही कपात सर्व प्रकारच्या निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक जल जोडणीधारकांना लागू आहे.

– पाणीकपात लागू असताना अतिरिक्त जलजोडणी किंवा जलजोडणीचा आकार वाढवण्याच्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही.

– ठाणे, भिवंडी येथील महापालिकांना केल्या जाणाऱया पाणीपुरवठय़ातदेखील 10 टक्के कपात लागू केली जाणार आहे. ही कपात पुढील वर्षी पावसाळा सुरू होईपर्यंत सुरू राहणार आहे.
मुंबईची दररोजची पाण्याची गरज

सातही तलाव पूर्ण भरलेले असतानाचा पाणीसाठा – 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर
सप्टेंबर महिनाअखेरीस पाणीसाठा – 13 लाख 17 हजार 819 दशलक्ष लिटर, 
तूट – 9 टक्के

पाणीकपात असेल तर दरकपात पण करा
मुंबईत सध्या सर्वच भागांत अघोषित पाणीकपात सुरूच आहे. गेला महिनादीड महिना मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आज फक्त प्रशासनाने अधिकृतरीत्या पाणीकपात जाहीर केली, मात्र सदस्यांना चर्चा करू दिली नाही असा आक्षेप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी घेतला आहे. प्रशासनाने पाणीकपात केली असेल तर दरकपात करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत