ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचारी उद्यापासून संपावर

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for ऑर्डनन्स फॅक्टरी मुंबई

लष्कराच्या तिन्ही दलांना शस्त्रास्त्रे व स्फोटके पुरिवणाऱ्या देशभरातील ४१ व राज्यातील १० कारखान्यांमधील उत्पादन उद्या, बुधवारपासून तीन दिवस बंद होणार आहे. शस्त्रनिर्मितीचे काम खासगी कंपन्यांना देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात या कारखान्यांमधील (ऑर्डनन्स फॅक्टरी) कर्मचारी पहिल्यांदाच मोठ्या संपावर जात आहेत. त्यामध्ये देशभरातील ४ लाख व महाराष्ट्रातील ४० हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

देशातील ऑर्डनन्स फॅक्टरींना २१६ वर्षांचा जुना इतिहास आहे. मात्र केवळ या कारखान्यांमध्येच तयार होणाऱ्या २७५ प्रकारच्या शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांच्या निर्मितीचे काम आता केंद्र सरकारने खासगी कंपन्यांकडे सोपवले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने २७९ कंपन्यांना ३८४ परवाने दिले आहेत. याखेरीज लष्कराच्या दुरुस्ती डेपोचे कामदेखील एकतर खासगी कंपनीकडे सोपवले जात आहे किंवा काही डेपो बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचा निषेध करण्यासाठी ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशनने (एआयडीईएफ) ही संपाची हाक दिली आहे. इंडियन डिफेन्स वर्कर्स फेडरेशन व भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने या संपाला पाठिंबा दिला आहे.

फेडरेशनचे सरचिटणीस सी. श्रीधर यांनी याबाबत एका वृत्त संस्थेला सांगितले की, ऑर्डनन्स फॅक्टरी व संरक्षणाशी संलग्न काम हे केवळ सरकारी कंपन्यांकडेच हवे. ते काम खासगी कंपन्यांना दिल्याने सार्वभौमत्वच संकटात आले आहे. ऑर्डनन्स फॅक्टरींमधील उत्पादने महाग असल्याचे कारण लष्कराकडून दिले जात आहे. वास्तवात या कारखान्यांमधील उत्पादनांच्या किमतीत सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कमही जोडली आहे. त्यामुळे उत्पादने महाग आहेत. सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद करून देशातील ऑर्डनन्स फॅक्टरी वाचवाव्यात, पडद्याआडून होणारे खासगीकरण थांबवावे या मागण्यांसाठी पहिल्यांदाच असा मोठा संप पुकारला जात आहे.

महाराष्ट्रावर संपाचा परिणाम 
राज्यात एकूण १० शस्त्र व स्फोटके निर्मिती कारखाने आहेत. त्यामध्ये स्फोटके कारखाना खडकी (पुणे), उच्च स्फोटके फॅक्टरी खडकी, मशीन टूल फॅक्टरी अंबरनाथ (मुंबई) या विशेष कारखान्यांसह अंबाझरी (नागपूर), भंडारा, भुसावळ, चांदा (चंद्रपूर), देहू रोड (पुणे), वरणगाव व अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्टरींचा समावेश आहे. यापैकी देहू रोड व अंबाझरीच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये पिनाका या क्षेपणास्त्र प्रणालीसह लष्करासाठी अत्यावश्यक असलेल्या विविध तोफगोळ्यांच्या निर्मितीचे काम चालते. चांदा येथील कारखान्यात तोफगोळ्यांमध्ये बारुद भरण्याचे काम चालते. हे सर्व संवेदनशील व महत्त्वाचे काम तीन दिवस बंद असेल. याखेरीज खडकी येथील भूदलाचा दुरुस्ती डेपो आणि मुंबईतील नौदल गोदीतील बोटींच्या दुरुस्तीचे कामही थांबणार आहे.

लष्कराला शस्त्र व स्फोटके वेळेत आणि मुबलक प्रमाणात मिळायलाच हवीत. पण हे काम सरकारी कारखाने दोन शतकांपासून करीत असताना ते खासगी कंपन्यांना देणे सुरक्षेच्यादृष्टीने घातक असू शकते. पण त्याचवेळी सरकारी कंपन्यांनीही उत्पादनाचा वेग वाढवायला हवा. अखेर शस्त्रसज्जता ही लष्कराची खरी भूक आहे. अर्थात त्यासाठी सरकारनेही स्वत:च्या कारखान्यांना आधी बळ द्यायला हवे. आवश्यकतेनुसार अर्थसंकल्पीय तरतूद वाढवायला हवी. यासाठी या कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या व आगामी अर्थसंकल्पाच्याही तोंडावर पुकारलेल्या या संपाची दखल केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यायलाच हवी.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत