ओला-उबेर चालक-मालक 19 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार

मुंबई : रायगड माझा वृत्त

ओला-उबेर कंपन्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे ओला-उबेर चालक 19 नोव्हेंबरला विधान भवनावर धडक देणार आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे व मुंबईसह 65 हजार चालक-मालक कुटुंबीयांसह 19 नोव्हेंबरला भारतमाता येथून विधान भवनावर धडक मोर्चा काढणार आहेत.

ओला-उबेर चालक, मालक, कंपन्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिवाळीआधी बोलावली होती. या बैठकीत दिलेली आश्वासने कंपन्यांनी पाळली नाहीत. यामुळेच आंदोलन करावे लागत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली. ओला आणि उबेर या दोन्ही कंपन्यांकडून वाहनचालक-मालकांना संप काळात 12 दिवसांचे नुकसान झाले होते. त्याच्या भरपाईसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत एक विशेष दिवाळी ऑफर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच भविष्यात वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीनुसार प्रत्येक किलोमीटरमागे दर वाढवून देण्याचा प्रस्ताव आम्ही लवकर आणणार असल्याचे स्पष्ट आश्वासन ओला-उबेरकडून दिल्यानंतर संघटनेकडून हा संप मागे घेण्यात आला होता. मात्र, यातील कोणताही प्रस्ताव अथवा मागण्या मान्य झाल्या नाही.

20 नोव्हेंबरनंतर ओला उबेर चालक-मालकांनी आंदोलन छेडल्यास संघटना त्याला जबाबदार राहणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची राहील, असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत