ओला चालकाला लिफ्ट मागून लुटणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

रात्री- अपरात्री प्रवाशांना घरी सोडण्यासाठी तत्पर असलेल्या ओला चालकांसाठी रात्रीचा प्रवास जीवघेणा ठरु लागलाय. कारण बदलापुरात एका ओला चालकाला मध्यरात्रीच्या सुमारास चाकूच्या धाकानं लुटल्याची घटना समोर आली आहे.

हॅण्डब्रेक दाबून धावत्या गाडीतून उडी, ओला चालकाने लुटारुंपासून जीव वाचवला

मुंबई: मध्यरात्रीच्या सुमारास ओला चालकाला लिफ्ट मागून लुटणाऱ्या टोळीला बदलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या टोळीने चाकूच्या धाकावर ओला चालकाला तब्बल दोन तास फिरवल्याची माहिती समोर आली आहे.

रात्री- अपरात्री प्रवाशांना घरी सोडण्यासाठी तत्पर असलेल्या ओला चालकांसाठी रात्रीचा प्रवास जीवघेणा ठरु लागलाय. कारण बदलापुरात एका ओला चालकाला मध्यरात्रीच्या सुमारास चाकूच्या धाकानं लुटल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या भांडुप भागात राहणारा ओला चालक श्रवण यादव याच्यासोबत हा प्रकार घडला असून केवळ दैव बलवत्तर म्हणून श्रवण यादव जिवंत आहे.

श्रवण हा 5 तारखेच्या रात्री बदलापूरच्या जान्हवी लॉन्स परिसरात एका प्रवाशाला सोडण्यासाठी आला होता. तिथून परतत असताना, अचानक त्याच्या गाडीसमोर चार जण आले आणि त्यातल्या एकाची आई वारली असल्याचा बहाणा करत पुढे सोडण्याची विनंती केली. त्यामुळे श्रवणने त्यांना गाडीत घेतलं आणि घात झाला.

काही अंतरावर जाऊन श्रवण यादवने गाडीत गॅस भरला आणि पुढे निघाला. मात्र त्यानंतर या चौघांपैकी एकाने त्याच्या पोटाला चाकू लावत गाडी फिरवत राहण्याची धमकी दिली. तब्बल दोन तास हा खेळ सुरू होता. यानंतर श्रवणला बाजूला बसवून या चोरट्यांपैकी एकजण गाडी चालवायला बसला आणि इतरांनी श्रवण कुमारचं पाकीट, मोबाईल काढून घेतलं. नशिबानं गाडी बदलापूर पूर्व – पश्चिम फ्लायओव्हरजवळ येताच श्रवणला पोलिसांची गाडी दिसली. यावेळी त्याने प्रसंगावधान राखत हॅन्डब्रेक ओढला आणि गाडीतून खाली उडी मारली. मात्र यावेळी चोरटे त्याची गाडी घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ श्रवण यादवच्या गाडीचा आणि चोरट्यांचा शोध सुरु केला. श्रवणने ज्या पंपावर गॅस भरला होता, तिथल्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले होते. त्या साहाय्याने शोध घेत रात्रीच्या रात्रीच चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या, तर जीपीएस लोकेशनच्या साहाय्याने त्याची गाडीही शोधून काढण्यात आली.

काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्येही अशाचप्रकारे मौजमजेसाठी ओला चालकांना लुटणारी कॉलेज तरुणांची टोळी पोलिसांनी पकडली होती. त्यानंतर ओला चालकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र रात्रीच्या वेळी  गरजूंना सेवा देणाऱ्या ओला चालकांना अशा घटनांना सामोरं जावं लागत असल्याने, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत