ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजाची माहिती दिल्यास १० लाख डॉलर्सचे बक्षिस

न्यूयॉर्क : रायगड माझा वृत्त

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन याचा पत्ता सागणाऱ्याला १० लाख डॉलर्सचे (सुमारे ७ कोटी रुपये) बक्षिस देण्यात येईल अशी घोषणा अमेरिकेने केली आहे. वडील ओसमा बिन लादेन याच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या उद्देशाने हमजा अमेरिका आणि सहकारी देशांवर हल्ला करण्याचा कट रचत असल्याने अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने बक्षिसाची रक्कम जाहीर करतना सांगितले. हमजाने हल्ल्याची धमकीही दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

लादेन याची अल कायदा ही दहशतवादी संघटना गेल्या काही काळापासून शांत आहे असे भासत असले तरी देखील हा आत्मसमर्पणाचा भाग नसून हा डावपेचाचा भाग असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी नाथन सेल्स यांनी म्हटले आहे. अल कायदा या संघटनेकडे हल्ल्याची क्षमता आणि उद्देश असल्याने त्या संघटनेला समजून घेण्यात कोणतीही चूक होता कामा नये, असेही नाथन म्हणाले.

हमजा बिन लादेनने काही दिवसांपू्र्वीच ९/११ हल्ल्यासाठी विमानाचे अपहरण करणारा मोहम्मद अट्टा याच्या मुलीशी लग्न केले आहे. ओसामाच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ओसामा बिन लादेनच्या सावत्र भावांनी ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लग्नाचा उल्लेख केला आहे. हमजाला अल कायदा संघटनेत उच्च पद मिळाले आहे आणि आता त्याच्या वडिलांचा बदला घेण्याची तयारी करत आहे, असे अहमद आणि हसन अल अत्तास या ओसामाच्या सावत्र भावांनी मुलाखतीत म्हटले आहे. हमजा हा ओसामाच्या जीवंत वाचलेल्या तीन पत्नींपैकी एकीचा मुलगा आहे. हमजाची आई अमेरिकेवर हल्ला झाला त्यावेळी हमजासोबत ऐबटाबादमध्ये राहत होती.

याबाबत आलेल्या वृत्तांनुसार, हमजाची पत्नी इजिप्तची आहे. ओसामा बिन लादेन मारला गेल्यानंतर त्याच्या पत्नी आणि मुलांना सौदी अरबमध्ये माजी राजकुमार मोहम्मद हिन नायेफ यांनी आश्रय दिला. ओसामाच्या पत्नी आणि त्याची मुलं ओसामाची आई आलिया घानेमच्या संपर्कात आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत