औरंगाबादमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद; जाळपोळ-दगडफेकीत एकाचा मृत्यू

अनधिकृत नळावरून शहर पेटले ; संचारबंदी लागू!

औरंगाबाद : रायगड माझा

मागील दोन महिन्यांपासून शांत असलेल्या औरंगाबाद शहरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून दोन गट तुफान हणामारी झाली. येथील मोतीकारंजा परिसरात दोन गटात तलवारी,चाकूसह शुक्रवारी रात्री भिडले. जमावाने शहागंजमध्ये केलेल्या जाळपोळीत एकाचा तर पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. दगडफेकीत अनेक नागरिकांसह पोलिस कर्मचारी आणि अधिकारी देखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी शहरात संचारबंदी लागू केली आहे.

मोतीकारंजा, गांधीनगर, शहागंज, आणि चिकलठाणा भागात शुक्रवारी रात्री दोन गटांत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. यानंतर काही भागांमध्ये वाहने आणि दुकानांची जाळपोळ करण्यात आली. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दाखल झालेल्या पोलिसांच्या तुकडीवर जमावाने तुफान दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

औरंगाबाद महापालिकेकडून अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. गुरुवारपासून सुरु झालेल्या या मोहिमेत पहिल्या दिवशी एका धार्मिक स्थळाचे अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यात आले. त्यानंतर एका गटाने दुसऱ्या एका धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन तोडले. त्यावरून शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाने तोडफोड, जाळपोळ देखील केली. यावर प्रतिक्रिया म्हणून दुसरा गट देखील रस्त्यावर उतरला आणि त्याने तोडफोड व जाळपोळ सुरु केली. 

दगडफेकीत एकाचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. त्यात पोलिस कर्मचार्‍याचा समावेश आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापौर नंदकुमार घोडेले आणि पोलिस प्रशासनाने केले आहे. तसेच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, शुक्रवारी रात्री एका दुकानासमोर उभ्या असलेल्या दोन गटांत किरकोळ कारणावरून वाद झाला आणि या घटनेचे रूपांतर जाळपोळीत झाले. नंतर इतर भागांत देखील याचे लोण पसरले अशी माहिती पोलिसांनी दिली. परंतु आता तणाव पूर्णपणे निवळला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे, आवाहन शहरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत