औरंगाबाद मराठा आरक्षण : महाराष्ट्र बंदच्या बंदोबस्तात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त 

महाराष्ट्रात सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन दिवसेंदिवस हिंसक होत चाललं आहे. औरंगाबादमध्ये शाम पाटगावकर या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. शाम हे कायगाव टोक येथे बंदोबस्ताला होते. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याच ठिकाणी काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली होती. जमावाकडून दगडफेक होत असताना धावपळीत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. औरंगाबादमध्ये आज एसटी वाहतूक सकाळपासून बंद आहे. 

 

एसटीचे ९० लाखांचे नुकसान 

आंदोलनामुळे आतापर्यंत सुमारे ९० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद असून मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त आंदोलकांकडून अग्निशमन दलाच्या गाडीची जाळपोळ करण्यात आली आहे.

आंदोलनात घुसलेत समाज कंटक

मराठा आंदोलनात काही समाज कंटक घुसलेत त्यामुळे मराठा आंदोलन बदनाम करत असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलंय. आरक्षण देणं हे सरकारच्या हातात नाही. आरक्षणाचा निर्णय हा न्यायालयातच होणार आहे. आंदोलनं करून बसेस जाळून आरक्षण मिळणार नाही. त्यामुळं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन चंद्रकांत दादांनी केलंय.

दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीनही जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झालाय. कोल्हापूरमध्ये आजपासून मराठा समाजाने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर शहरातली अनेक दुकानं व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद केली असून, एसटीची सेवा ही तुरळक प्रमाणामध्ये सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सात एसटी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यातही अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आले आहेत.

दरम्यान, सकल मराठा मोर्च्याकडून उद्या नवी मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नांदेड येथेही मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण आले आहे. आंदोलकांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यात ४ ते ५ आंदोलक जखमी झाले. यात महिलांचाही समावेश आहे. नांदेड येथील राज कॉर्नरवर तणाव वाढत चालला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत