औरंगाबाद यामध्येही युतीचा ब्रेकअप ?

महाराष्ट्र News 24 वृत्त

राज्यातील बदलेल्या सत्ता समीकरणचे पडसाद आता औरंगाबादच्या राजकारणात उमटले. शिवसेने बरोबर फारकत घेत भाजपाचे उपमहापौर विजय औताडे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. महापालिकेच्या सर्वसाधरण सभेतच यासंदर्भात घोषणा करण्यात आली.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीस अवघे पाच महिने शिल्लक आहेत. युती तुटल्यामुळे भाजपा व शिवसेना राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजपा-शिवसेना युतीची औरंगाबाद महापालिकेवर साधारण ३० वर्षे सत्ता राहिली आहे. मात्र राज्यातील युती तुटल्यापासून औरंगाबाद महापालिकेतही याचे पडसाद जाणवत होते. मागील अनेक वर्षे महापालिकेच्या सभागृहात नेहमी एकत्र बसणारे युतीचे नगरसेवक मात्र राज्यातील युती तुटल्यानंतर या अगोदरच्या सर्वसाधरण सभेत वेगवेगळे बसल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आज जी सर्वसाधारण सभा सुरू झाली, तेव्हा भाजपाचे उपमहापौर विजय औताडे यांनी नेहमीप्रमाणे महापौरांच्या खुर्ची जवळ जाऊन बसणं नापसंत केलं व ते नगरसेवकांमध्ये समोर जाऊन बसले. याप्रकारानंतर उपस्थित सभासदांनी त्यांना असे करण्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, नागरिक आम्हाला विचारत आहेत की तुम्ही एकत्र निवडणुक लढवली मात्र आता तुम्ही सत्तेत एकत्र नाही, मग तुम्ही औरंगाबाद महापालिकेत एकत्र कसे? या प्रश्नावर उत्तर म्हणून मी माझ्या उपमहापौरपदाचा राजीनामा देतो आहे.

यामुळे आता जवळपास तीन दशक औरंगाबाद महापालिकेतील शिवसेना-भाजपाची अभेद्य युती, आज भाजपाच्या उपमहापौरांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे संपुष्टात येणार आहे का? याची केवळ औपचारिक घोषणा होणं बाकी आहे का? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत