‘कचरा’ पुन्हा पेटला..शिवसेनेचेच आंदोलन, विभागीय आयुक्त म्हणाले, रोजचा कचरा आम्ही उचलायचा?

औरंगाबाद :रायगड माझा वृत्त 

शहरातील कचराप्रश्‍नावरून महापालिकेत सत्‍ताधारी असलेल्‍या शिवसेनेवर सर्वत्र टीका होत असताना स्‍वत: शिवसेनेनेच याविरोधात आंदोलन करत अनेकांना बुचकाळ्यात पाडले. आज गुरूवारी शिवसेनेचे जिल्‍हाधिकारी प्रमुख अंबादास दानवे यांच्‍या नेतृत्‍वाखाली आंदोलन करत जिल्‍हाधिकारी कार्यालयात शिवसेनेतर्फे कचरा टाकण्‍यात आला. यावेळी ‘देवेंद्र फडणवीस हाय हाय’, ‘महाराष्ट्र शासन हाय हाय’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्‍यात आली.

कचऱ्यावरून विभागीय आयुक्तांची प्रतिक्रिया

कचरा प्रकरणात सनियंत्रण समितीने त्याची जबाबदारी पार पाडली. अंमलबजावणी करण्याचे काम महापालिकाचे आहे. आम्ही त्यांना जागा दिली, रोजचे काम आम्ही कारायचा का तसेच शासन नियंत्रण समितीने कचरा उचलायचा का? पोलिस बंदोबस्तात 500 टन कचरा दोन दिवसांत उचलला आहे. माझा काहीही राजकीय संबध नाही, माझ्यावर केले जाणारे आरोप बिनबुडाचे आणि बकवास आहेत. राजकीय लोकांनी काय करायचे ते ठरवावे! या प्रकरणात काय कारवाई करायची याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील. अशी प्रतिक्रिया पुरुषोत्तम भापकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अंबादास दानवेंचा राज्य सरकारवर आरोप

तत्पूर्वी, पत्रकारांशी बोलताना अंबादास दानवे यांनी राज्‍य सरकारवर आरोप केला की, सध्‍या महापालिकेत शिवसेनेचा महापौर असल्‍यामुळे कच-यासाठी जागा दिली जात नाही. ते म्‍हणाले, भाजपचा महापौर असताना नारेगावला कचरा टाकू दिला. सध्‍या शिवसेनेचा महापौर असल्‍यामुळे कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही. मात्र सरकार मनपा बरखास्त करण्याची धमकी देत आहे. यामध्ये राजकारण दिसत आहे.

म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात टाकला कचरा
तसेच कच-यासाठी जागा शोधण्‍याची जबाबदारी शासनाने आयुक्‍त, जिल्‍हाधिकारी व विभागीय आयुक्‍त यांना दिली होती. मात्र हे अधिकारी अद्याप महापालिकेला जागा देऊ शकलेले नाहीत. जिल्हाधिकारी सरकारचे प्रतिनिधी असल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा टाकला, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

दरम्‍यान जिल्‍हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्‍यात आल्‍यामुळे उग्र वास पसरला होता. आंदोलनानंतर थोड्या वेळाने 2 मशीन्‍सच्‍या साहाय्याने हा कचरा काढून टाकण्‍यात आला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत