कणकवलीत मनसेचे “मास्क बांधा’ आंदोलन

 कणकवली : रायगड माझा वृत्त

पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. धुळीच्या साम्राज्यात वाहनचालकांची अवस्था दयनीय झाली आहे. या निषेधार्थ व ठेकेदार कंपनीविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज कणकवलीत “मास्क बांधा’ आंदोलन छेडले.

शहरात महामार्गावरील पटवर्धन चौकात अर्धा तास रास्ता रोको करून दुचाकीधारकांना मास्क बांधले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर, उपजिल्हाध्यक्ष अनिल राणे, कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, उपतालुकाध्यक्ष गुरू भालेकर, शहर अध्यक्ष शैलेश नेरकर, देवगड तालुकाध्यक्ष मयुर मुणगेकर, प्रभाकर राणे, अजू मालवणकर, शरद सावंत, कुडाळकर आदींसह कार्यकर्त्यांनी मुख्य चौकात आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हे आंदोलन सुरू केले.

यावेळी काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. महामार्गावरून लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या दुचाकीधारकांना जेथे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे तेथे, धुळीच्या साम्राज्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच खारेपाटणपासून झारापर्यंत काम सुरू आहे. कणकवली आणि कुडाळ तालुक्‍यातील चौपदरीकरणाच्या परिसरात येथे काम सुरू आहे तेथे या धुळीच्या साम्राज्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कच्च्या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे पाणी मारले जात नाही. नियमाप्रमाणे येथे दर तासाला पाणी मारणे अपेक्षित आहे; मात्र पाणी मारले जात नाही या निषेधार्थ मनसेने आंदोलन करत मास्कचे वाटप केले. नागरिकांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळाला. वाहनचालकांच्या मनातील खदखद मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन मांडल्याने दुचाकी धारकांनी मास्क बांधून घेण्यास सहकार्य दाखवले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत