कपिल पाटलांना मनीषा कायंदे यांचे पुन्हा आव्हान! 

मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ठरणार लक्षवेधी!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुंबईत विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाबरोबरच होणाऱ्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत. विद्यमान आमदार कपिल पाटील यांना गेल्या निवडणुकीत भाजपमधील बंडखोर उमेदवार प्रा. मनीषा कायंदे यांनी आव्हान दिले होते. त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. प्रा. कायंदे आता शिवसेनेत सक्रिय असून, राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर त्या शिवसेनेचा चेहरा म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत.

बलाढ्य उमेदवार मानल्या जाणाऱ्या शिक्षक भारतीच्या कपिल पाटील यांना त्या पुन्हा आव्हान देणार काय, हे काही दिवसांत स्पष्ट होईल. शिक्षक मतदारसंघात पूर्वी संघ परिवारातील शिक्षक संघटना निवडणूक लढवत असत. संजीवनी रायकर या मतदारसंघातून सातत्याने निवडून येत. त्यांच्या निवृत्तीनंतर शिक्षक परिषदेला हा मतदारसंघ राखता आला नाही.

कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना वेळोवेळी आव्हान दिले असून, शिक्षकांचे पगार मुंबई बॅंकेत जमा करण्यावरून दोघांत चांगलाच वाद झाला होता. पाटील यांना शह देण्यासाठी आता परिवारातील शिक्षक परिषदेऐवजी हा मतदारसंघ भाजपने स्वत:च्या अखत्यरीत घेण्याची तयारी दाखवली आहे.

साठ्ये महाविद्यालयातील प्रा. देशमुख यांना भाजपने या मतदारसंघात पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ गेल्या वेळी निरंजन डावखरे यांनी जिंकला होता. राष्ट्रवादीचे नेते असणाऱ्या डावखरे यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्यामुळे भाजप नेते संजय केळकर यांना पराभव पत्करावा लागला होता. आता ठाणे तसेच नाशिक येथे उमेदवार कोण, याचा निर्णय भाजप लवकरच घेईल; मात्र मुंबई पदवीधरच्या शिवसेना प्रांगणात भाजप शिरणार काय, हे देखील महत्त्वाचे असेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत