कपिल पाटील यांचा नाराज ‘पत्रप्रपंच’

Image may contain: 3 people, people standing, people on stage and text

मुंबई : रायगड माझा वृत्त

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक विरोधी पक्षांनी एकजुटीने लढावी यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने पुढाकार घेतला आहे; पण कोणत्याही मुद्द्यांची वा कार्यक्रमांची चर्चा न करता मित्रपक्षांना तीन जागा सोडून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी झाल्याचे जाहीर केले आहे, याचे आश्‍चर्य वाटते. छोट्या डाव्या पुरोगामी पक्षांनी प्रचाराच्या वाजंत्री वादनाचे काम करावे, अशी आघाडीची अपेक्षा दिसते,” अशा शब्दांत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

कपिल पाटील यांच्या पक्षाचे फारसे वर्चस्व नसले तरी त्यांनी घेतलेला आघाडी विरोधातल्या नाराजीचा सूर पाहता महाआघाडीतील घटक पक्ष समाधानी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आमदार कपिल पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषा बोलत असून, त्यांचा बोलवता धनी मुख्यमंत्री असल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी केला आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांना उद्देशून कपिल पाटील यांनी पत्र लिहले आहे. यामध्ये ते म्हणतात, की “प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय महाराष्ट्रात महाआघाडीला पूर्ण स्वरूप येऊ शकणार नाही. प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना एक- एक जागा सोडली आणि अन्य पक्षांना विधान सभेत जागा सोडण्याचे आश्वासन दिले की आघाडी झाली, असे आपण मानत असाल तर वास्तवापासून आपण खूप दूर आहोत. देशातील आणि महाराष्ट्रातील स्थितीमध्ये अंतर आहे. महाराष्ट्रात योगी किंवा खट्टर सरकार नाही.’

कॉंग्रेस – “राष्ट्रवादी’ला इशारा
विरोधकांपेक्षा सरकारची बाजू मजबूत असल्याचे स्पष्ट करताना कपिल पाटील यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसला गर्भित इशारा देताना स्पष्ट केले आहे, की राज्यात मराठा आरक्षण जाहीर झाले आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. हिवाळी अधिवेशनात ना सरकारला थंडी वाजली ना विरोधी पक्षांची धग जाणवली. राज्यात 1972 पेक्षा तीव्र दुष्काळ आहे. आताच पाणीटंचाई आहे. पुढचे सात महिने काढायचे आहेत. शेतकरी त्रस्त आहे; पण दुष्काळाच्या प्रश्नावर सभागृहात ना चर्चा झाली, ना सरकारला घेरता आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत