कपिल सिब्बल ‘तिथे’ का होते?: भाजपचा सवाल

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

ईव्हीएम हॅक करता येते हा अमेरिकी सायबर तज्ज्ञाचा दावा खोडून काढत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस समर्थकांनीच लंडनमधील हॅकथॉनचे आयोजन केले होते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बलकार्यक्रमाची देखरेख करत होते असा आरोप करताना, यामागे राहुल गांधी हेच असल्याचा गंभीर आरोप प्रसाद यांनी केला. त्या ठिकाणी कपिल सिब्बल का उपस्थित होते, याचा खुलासाही काँग्रेसनं करावा, असं आवाहनही प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केलं.

भारतातील २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आल्या होत्या, असा दावा कथित अमेरिकी सायबर तज्ज्ञ सय्यद सुजा याने सोमवारी दावा केला.

लंडनध्ये ज्याने हॅकथॉनचे आयोजन केले तो आशीष रे हा काँग्रसचाच समर्थक आहे, असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला. हॅकथॉनचे संपूर्ण आयोजनच काँग्रेसनं केल्याचा त्यांनी स्पष्ट आरोप केला.

निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानेच राहुल गांधी अशा कुरापती काढत असल्याचा आरोपही प्रसाद यांनी केला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पराभव होणार आहे हे माहीत असल्यानंच राहुल असे बहाणे शोधत आहेत. राहुल गांधी कधीही गृहपाठ करत नाहीत. निवडणुकीत पराभव व्हावा यासाठी राहुल आणखी काय काय कुरापती काढतील, काही सांगता येत नाही, असा टोलाही प्रसाद यांनी लगावला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत