कराडमध्ये मुख्याधिकाऱ्यांची हॉकर्सना हुलकावणी

कराड : रायगड माझा

कराड शहरात नगरपालिकेच्या वतीने मंगळवारी अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली. याविरोधात हॉकर्स संघटनेने बुधवारी पालिकेत ठिय्या आंदोलन केले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून शुक्रवारी बैठकीचे नियोजन करुन तोडगा काढण्याचे अश्‍वासन दिल्याने दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले. विविध मागण्यासंदर्भात हॉकर्स संघटना बुधवारपासून मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मुख्याधिकारी भेटण्यास टाळाटाळ करत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. दरम्यान शहरातील सर्व हातगाडा व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवत संघटनेच्या आंदोलनाला प्रतिसाद दिला.


मंगळवारी कराड-विटा मार्गावरील कृष्णा नाका ते कोल्हापूर नाका या दरम्यान अतिक्रमण विरोधी मोहिम राबवत 20 हून अधिक अतिक्रमणे हटवली होती. यामुळे हॉकर्स संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. शुक्रवारी बैठक होणार असली तरी तीन दिवस व्यवसाय बंद राहिल्याने उपासमारीची वेळ आली आहे. मात्र त्यानंतरही पालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा दावा हॉकर्स संघटनेकडून करण्यात आला आहे.
नगरपालिका आवारात साडेअकराच्या सुमारास मुख्याधिकारी आले. त्यानंतर ते एक ते दोन मिनिटातच पालिका आवारातून बाहेर निघून गेले. आम्ही चर्चा करण्यासाठी आलो होतो. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही दररोज पालिकेत येऊन ठिय्या मारणार असल्याचे हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वास्तविक मुख्याधिकाऱ्यांनी किमान आमचे म्हणणे ऐकून घेणे आवश्‍यक होते, असे सांगत हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कराड नगरपालिकेकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचा दावा करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
हॉकर्स संघटनेच्या या आंदोलनात जावेद नायकवडी, प्रमोद तोडकर, प्रकाश जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या होत्या. सकाळी 11 वाजता हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, मुख्याधिकाऱ्यांसह पालिका प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी नगरपालिकेत गेले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.