बिग बॉसच्या घरात आठवड्याचा शेवट महत्त्वाच्या घडामोडींमुळे गाजतो. दर आठवड्याला घरातील एका सदस्याला घराबाहेर जावं लागतं. या आठवड्यात जुई गडकरीला घरातून बाहेर जावं लागलं. सुशांत, सई, जुई आणि आस्ताद हे चौघे नॉमिनेट झाले होते. सुशांत सुरक्षित राहिला, तर जुई, सई आणि आस्ताद हे डेंजर झोनमध्ये होते. बिग बॉसने सई सुरक्षित असल्याचे सांगितल्यानंतर सईचा जीव भांड्यात पडला. आस्ताद आणि जुई यांच्यापैकी एक जण घरातून बाहेर जाणार हे निश्चित होतं. पण, शेवटी जुईला बिग बॉसचे घर सोडावे लागले.
दरम्यान, मागील आठवड्यात जुईने बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची विनंती केली होती. जुई मानसिकदृष्ट्या खचली असून मला इथून बाहेर काढा, अशी विनंती तिने केली होती. बिग बॉसच्या घरात घडणार्या गोष्टी जुईने उघडपणे सांगितल्या होत्या. घरात घडत असलेल्या गोष्टी अत्यंत चुकीच्या असल्याचे जुईने म्हटले होते. ‘मला या घरात मानसिक त्रास होत असून माझ्या डोक्यात अनेक गोष्टी सुरू असतात. परंतु, मी त्या कोणाशी शेअर करू शकत नाही. या घरात अन्याय होत आहे. या अन्यायाचा राग येतोय. मेघा, सई अत्यंत चुकीचं वागत आहेत. परंतु, दर शनिवारी मला ओरडा ऐकून घ्यावा लागतो. मी कारणं देते आणि टास्क करत नाही, हे ऐकून घ्यावं लागतं. त्यामुळे मला याचा आता कंटाळा आला आहे.’ असे जुई बिग बॉसला म्हणाली होती. जुई घराबाहेर गेल्याने रेशम, उषा नाडकर्णी, सुशांत, आस्ताद, भूषण भावूक झाले होते.