कर्जतच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे अशोक ओसवाल; गटनेतेपदी शिवसेनेचे नितीन सावंत

कर्जत : भूषण प्रधान

कर्जत नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्ष पदाची आज निवडणूक संपन्न झाली. या उप नगराध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये भाजपचे अशोक ओसवाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. कर्जत नगर परिषदेच्या इतिहासात भाजपला हे मानाचे पद पहिल्यांदाच मिळाल्याबद्दल अशोक ओसवाल यांनी मतदारांचे आणि आपल्या पक्षाचे आभार मानले आहे.

गेल्या महिन्यात पार पडलेल्या कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीने आपली सत्ता काबीज केली. त्या निवडणुकीत शिवसेनच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सुवर्णा नाईक या विजयी झाल्या. त्यानंतर आज उपनगराध्यक्ष, गटनेता आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. या निवडीमध्ये अशोक ओसवाल यांची उप नगराध्यक्ष आणि गटनेता म्हणून शिवसेनेचे नितीन सावंत यांची निवड करण्यात आली. तर स्वीकृत नगरसेवक पदी शिवसेना भाजपा युतीकडून संकेत भासे आणि राष्ट्रवादी मनसे आघाडीकडून धनंजय दुर्गे यांची निवड करण्यात आली आहे.

उप नगराध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर अशोक ओसवाल यांनी शिवसेना भाजपा युतीचे आभार मानले आहेत, तसेच येणाऱ्या काळात विविध विकासकामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने काम करणार असल्याचे मत अशोक ओसवाल यांनी व्यक्त केले

स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीनंतर शिवसेनेचे संकेत भासे यांनी लोकांची सेवा करणे हे माझे कर्तव्य समजून काम करणार असल्याचे सांगितले. तर मनसेचे धनंजय दुर्गे यांना राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून मिळालेले स्वीकृत नगरसेवक पद जनतेच्या विकासाठी असल्याचे मत मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत