कर्जतमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह, महिलेचा खून झाला असल्याचा संशय

कर्जत -अजय गायकवाड

कर्जत तालुक्यातील कशेळे परिसरातील लोभ्याचीवाडी येथील जांभळीच्या माळावर अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने मृतदेहाची ओळख पटलेली नाही. हा मृतदेह महिलेचा असल्याचे सांगण्यात येत असून या महिलेचा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांकडून समजले आहे.


कर्जत तालुक्यातील लोभ्याची वाडी शेजारी असणाऱ्या जांभळीच्या माळावर  नेहमी प्रमाणे गावातील मुले क्रिकेट खेळत असताना मुलांना हा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. या परिसरात काही अपरित घडले असल्याचे मुलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना ही घटना सांगितली. ही घटना ग्रामस्थांनी लगेचच पोलिसांना कळविली.

पोलिसांनी तात्काळ घटनासाठी धाव घेऊन त्यांनी ते मुतदेह जमिनीतून बाहेर काढले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी पाहणी केल्यानंतर हा मृतदेह मुस्लिम महिलेचा असून या महिलेचा खून करून याठिकाणी पुरण्यात आला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

घटना घडली आहे त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर फार्म हाऊसेस आणि रिसॉर्ट आहेत. या ठिकाणीच गुन्हा घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. या ठिकाणी खून करून त्याच ठिकाणी पुरणे गुन्हेगाराला सहज सोपे आहे. करण कोणतीही वर्दळ नसलेल्या या जागेवर गुन्हा करणे गुन्हेगाराला सोपे आहे. सदर महिलेच्या मृतदेहाबाबतीत देखील अशाच कोण्या फार्म हाऊसवर त्या महिलेला मारून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन लोभेवाडीच्या  माळरानावर तिला पुरली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यावेळी घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल, पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे नायब तहसीलदार सुधाकर राठोड नेरळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव व कर्जत पोलिसांची टीम उपस्थित होते. कर्जत पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून अज्ञात महिलेच्या खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कर्जत पोलीस करीत आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत