कर्जतमध्ये नसरापूर मध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता; भाजपानेही खाते उघडले

  • कर्जत तालुक्यात थेट सरपंच पदी संमिश्र कौल
  • नसरापूर मध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता; भाजपानेही खाते उघडले

कर्जत : कांता हाबळे 

कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या २७ मे रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकींचा निकाल जाहीर झाला असून यात २ ग्रामपंचायती शिवसेनेकडे २ राष्ट्रवादी तर भाजपनेही खाते उघडले असून ओलमण ग्रामपंचायत भाजपने जिंकली आहे. शिवसेनेने नसरापूरमध्ये राष्ट्रवादीचा मोठा पराभव करत ग्राम पंचायतीवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. तर दुसरीकडे भाजपने आपले खाते उघडत ओलमण ग्राम पंचायतीवर आपला झेंडा रोवला आहे.

कर्जत तालुक्यात पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका २७ मे रोजी घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदासाठी १२ उमेदवार रिंगणात होते. तर ग्रामपंचायतीमधील ३९ ग्रामपंचायत सदस्यांपैकी १२ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरित ३६ जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात होते. नसरापूर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या प्रमिला मोहिते या ४९८ मतांनी विजयी झाल्या, तर नांदगाव ग्रामपंचातीमध्ये राष्ट्रवादीच्या दीपिका नाना आसवले या विजयी झाल्या. ओलमण ग्रामपंचायतीमध्ये भाजप च्या सरिता धर्मा पादिर या विजयी झाल्या आहेत. खाडंस  ग्रामपंचायतीच्या ५ जागा बिनविरोध झाल्या होत्या तर थेट सरपंच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे मंगल जयवंत ऐनकर हे विजयी झाले आहेत. तर अंभेरपाडा या नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये ७ पैकी ५ जागा बिनविरोध झाल्या होत्या या ग्रामपंचायतीच्या थेट सरंपच पदाच्या शिवसेनेच्या मयुरी वंसत तुगे या विजयी झाल्या आहेत.

कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायती मध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस-भाजप आघाडी यांची लढत झाली.तेथे शिवसेनेने ११ पैकी १० जागा जिंकून मोठा विजय मिळविला तर थेट सरपंचपद देखील मोठ्या फरकाने  जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मोठा पराभव केला.

तर नव्याने निर्माण झालेल्या अंभेरपाडा ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेने विकास आघाडीच्या माध्यमातून बहुमतासह थेट सरपंचपद मिळविले तर नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेस आघाडीने थेट सरपंच पद काबीज केले. ओलमण ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदावर उभे असलेले भाजप उमेदवार सरिता धर्मा पादीर  यांनी शेकाप-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला आणि भाजपचा कर्जत तालुक्यात पहिला सरपंच विराजमान झाला आहे.

खांडस मध्ये धक्कादायक निकाल लागला असून प्रत्यक्ष मतदानापूर्वी आदिवासी विकास आघाडीने १० पैकी ५ जागा बिनविरोध जिंकल्या होत्या मात्र थेट सरपंच निवडणुकीत एकट्या लढणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेसने चमत्कार घडवीत थेट सरपंच पदावर विजय मिळविला आहे.

गेल्या ५० वर्षापासून ओलमण ग्राम पंचायतीवर असलेली शेतकरी कामगार पक्षाची एकहाती सत्ता उलटून लावण्यात भाजपला यश आले आहे. कालपर्यंत शहरी भागातील पक्ष अशी आमच्यावर टीका व्हायची पण आता कर्जत मधील ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेले यश हे ग्रामीण भागातही आमचे पाय घट्ट रोवले गेलेत याचे उदाहरण आहे. : दीपक बेहरे, तालुकाध्यक्ष, भाजपा कर्जत 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत