कर्जतमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोराने केले लंपास

कर्जत : रायगड माझा वृत्त 

गेल्या अनेक दिवसांपासून कर्जत शहरात आणि परिसरात चोरीच्या घटना वाढत आहेत. आज सकाळी कर्जत बाजारपेठेत दोन मोटर सायकल स्वारांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पसार झाल्याची घटना घडली आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.

आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कर्जत शहरातील महावीर पेठेत राहणारे प्रसिध्द व्यापारी घेवरचंद ओसवाल यांच्या पत्नी कांचन ओसवाल य़ा नेहमी प्रमाणे सकाळी आठ वाजता मंदिरातून घरी परत येत असताना दोन तरुण मोटर सायकल वरून आले. कांचन ओसवाल यांना रस्त्याबाबात माहिती विचारण्याच्या बहाण्याने संधीचा फायदा घेत ओसवाल यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे मंगळसूत्र खेचून त्यांनी पोबारा केला. कांचन ओसवाल यांनी भीती पोटी आरडा ओरड केली पण तो पर्यंत चोरटे तिथून पळून गेले होते. त्या दोघा चोरांनी हेल्मेट घातले असल्याने त्यांचा चेहरा मात्र त्या बघू शकल्या नाहीत. तात्काळ य़ा घटनेची कर्जत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली असून पोलिसांनी तेथील सीसीटीवी फूटेजच्या आधारावर तपास सुरु केला आहे. दरम्यान चोरांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याने अशा घटना कर्जत शहरात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.ब्युरो

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत