कर्जत गेलं खड्ड्यात, रस्ते बनले मृत्यूचा सापळा!

कर्जत : अजय गायकवाड । कांता हाबळे 

कर्जत तालुक्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. प्रशासनाने अद्याप खड्डे भरले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. खड्ड्यांवरून आता कर्जतमधील राजकारण तापू लागले आहे. सोशल मीडियावरील ग्रुपसह राजकीय पक्षांना खड्ड्यांनी जागे केले आहे. कर्जत तालुक्यात ठेकेदारांची लॉबी कार्यरत आहे. जवळपास सर्वच ठेकेदार प्रमुख पक्षांचे पदाधिकारी आहेत. त्यांना असलेला राजकीय पाठिंबा हेच तर खड्ड्याचे मूळ कारण तर नाही ना! 

 

कर्जत गेलं खड्ड्यात, रस्ते बनले मृत्यूचा सापळा

रस्त्याची मागणी करणारे पण तेच… मंजूर रस्त्याचे निकृष्ट काम करणारे पण तेच… रस्त्यावर पडणाऱ्या खड्डयांना जबबाबदार पण तेच आणि याच खड्ड्यांबाबत आवाज उठविणारे राजकीय पक्षाचे ठेकेदार पुढारी देखील हेच…हे वास्तव आहे कर्जत खालापूरमधील रस्त्यांच्या भयावह स्थितीचे…

कल्याण कर्जत या राज्य मार्गाचे अगदी अलीकडच्या काळात एमएमआरडीएने या रस्त्याचे काम केले. हे काम देखील अत्यंत निकृष्ट झाले. या रस्त्याची आणि त्यावरील देखभाल दुरुस्तीची जबाबदारी एमएमआरडीएची असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता ताब्यात घेण्याची अर्थपूर्ण घाई केली. आता खड्ड्यांमुळे कर्जत कल्याण रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. हीच अवस्था कर्जत मुरबाड रस्त्याची. या रस्त्याचे ठेकेदार देखील राजकीय पक्षाचे मोठे पुढारी. या रस्त्याची देखील खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. कर्जत पळसदरी रस्ता तर म्हणजे पावलापावलावर खड्डे. खड्डे चुकवत वाहन चालविणे म्हणजे थेट मृत्यशी गाठ.

कर्जत मधील रस्त्यांच्या या दुरवस्थेला जबाबदार कोण याचा जाब विचारण्यासाठी कर्जत मधील नागरिकांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठले. तांत्रिक कारण पुढे करण्यापेक्षा रस्ते खड्डेमुक्त करा असे नागरिकांचे म्हणणे होते. रस्त्याच्या दुरवस्थेला अधिकारी ठेकेदार यांची मिलीभगत जबादार असल्याचा आरोप केला गेला. यावेळी नागरिकांसह ठेकेदार असलेले राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

कर्जत मध्ये वर्षोनुवर्षे हे चक्र सुरु आहे. तेच पुढारी तेच ठेकेदार ही कर्जतमधील स्थिती आहे. ठेकेदारांना मिळणारे राजकीय पाठबळ यामुळे मोठे जनआंदोलन देखील उभे राहत नाही. खड्यांच्या दुरावस्थेचे वातावरण करायचे आणि पुन्हा खड्डे भरण्याच्या नावाखाली मलिदा खायचा ही दरवर्षीची बोंब आहे.

एकूणच कर्जत मधील रस्त्यांच्या दुरवस्थेला कोणी शासनाला दोष देतं तर कोणी निसर्गाला. पण रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे कर्जत खड्ड्यात गेले हे मात्र वास्तव आहे.

 

रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असायची हि वस्तुस्थिती आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणवर पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेणारे नाले हे बांधकाम व्यावसायिक आणि अन्य नागरिकांनी बंद केलेत तर काही ठिकाणी वळवले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा रस्त्यांवरून होत नसल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहे. 

अजय कुमार सर्वगौड: उप अभियंता- सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत

शासनाची चुकीची दरसूची आणि कर्जत तालुक्याची भौगोलिक स्थिती आणि पावसाचे प्रमाण यामुळे रस्त्यांची लवकर दुरवस्था होत आहे. दिलेल्या दरापेक्षा अधिक खर्च हे कामावर होत असल्याने रास्ताचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे यासाठी केवळ ठेकेदारांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. 

राहुल डाळींबकर  ठेकेदार संघटना

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत