कर्जत निवडणूक : राष्ट्रवादीने शक्तीप्रदर्शन करत दाखल केले उमेदवारी अर्ज

राष्ट्रवादीकडून प्रतीक्षा लाड नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या अठरा जागांसाठी शक्ती प्रदर्शन

कर्जत : अजय गायकवाड

कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार सुरेश लाड यांची कन्या ऍडव्होकेट प्रतीक्षा लाड यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी आपला उमेवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या अठरा जागांसाठी शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज सादर केले.

कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने मनसे-शेकाप आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आघाडीच्या माध्यमातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

आमदार सुरेश लाड यांची कन्या प्रतीक्षा लाड या राष्ट्रवादीकडून थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असतील अशी चर्चा होती. यावर आज शिक्कामोर्तब झाले. ऍडव्होकेट प्रतीक्षा लाड यांनी नगराध्यक्षपदासाठी आपले नामांकन अर्ज सादर केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंडयाबरोबर आज मनसेचे झेंडे देखील फडकत होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दहिवली येथील राष्ट्रवादी भवन येथून रॅली काढण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, कर्जत शहराध्यक्ष शरद लाड यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रतीक्षा लाड यांनी पुष्पहार अर्पण केले. राष्ट्रवादी आघाडीच्या रॅलीमध्ये तरुणांचा मोठा सहभाग होता; मात्र काँग्रेस पक्ष मात्र अलिप्त असल्याचे दिसले. काल शिवसेनेने केलेल्या शक्तिप्रदर्शनाला आज राष्ट्रवादीने दिलेले प्रत्युत्तर पाहता कर्जतची निवडणूक रंगतदार ठरणार हे मात्र नक्की.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत