कर्जत : पत्नीचा खून करून मृतदेह घरातच पुरला!

पत्नीची चारित्र्याच्या संशयावरून झाली हत्या

कर्जत : रायगड माझा वृत्त 

कर्जत तालुक्यातील दहिवली येथील इंदिरानगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केला आणि तिचा मृतदेह घरातच खड्डा खोदून पुरला. त्यानंतर १५ दिवसांनी पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत राहुल शिरसाठ याने पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनंतर हे प्रकरण उघडकीस आले.

मुंबई येथे राहणारा राहुल शिरसाठ याचा मामा संतोष गोविंद कसबे हा त्याच्या कुटुंबीयांसोबत कर्जत नगरपरिषद हद्दीतील इंदिरानगर येथे राहतो. राहुल १२ मे रोजी कसबेकडे गेला असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. याबाबत राहुलने कर्जत पोलीस ठाण्यात माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तपासणी केली असता, कसबेची सुसाईड नोट सापडली. यात पत्नी मनीषा हिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करून तिला काही दिवसांपूर्वी ठार मारून मृतदेह घरातच गाडल्याचे नमूद करण्यात आले होते. पंधरा दिवसांपूर्वीही राहुल पत्नी व मेव्हणीसह दहिवलीत आला असता, मामी मनीषा दिसली नसल्याने त्याचे चौकशी केली असता, ती भांडण करून निघून गेल्याचे कसबेने सांगितले. त्यानंतर राहुल कसबेच्या चारही मुलांना घेऊन भिवंडी येथील घरी गेला. त्यानंतरही त्याने अनेकदा कसबेकडे त्याच्या पत्नीबाबत चौकशी केली. मात्र त्याने प्रत्येकवेळी उडवाउडवीचे उत्तर दिल्याचे राहुलने पोलिसांना सांगितले.

कर्जत पोलिसांनी चिठ्ठीच्या आधारे घरात तपास सुरू केला. यावेळी सिमेंटचा नवीन कोबा केल्याचे आढळल्याने खोदकाम केले असता मनीषाचा मृतदेह आढळला. कर्जत पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत