कर्जत रेल्वे पोलिसांचा प्रामाणिकपणा!

कर्जत : अजय गायकवाड 

रेल्वे पोलिसांची तत्परता आणि प्रामाणिकपणामुळे एका प्रवाशाचे ट्रेनमध्ये विसरलेले बत्तीस हजार सहाशे रुपये परत मिळण्याची घटना कर्जतमध्ये घडली आहे. 

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेकदा टीका होते, पण कर्जत रेल्वे पोलिसांनी या टीकेला छेद देणारी कामगिरी केली आहे. उल्हासनगर येथे राहणारे राकेश कुकरेजा हे मुंबई खोपोली ट्रेनने प्रवास करत होते. यावेळी उल्हासनगर स्थानक येताच ते घाईगडबडीत उतरले. यावेळी त्यांची रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग गाडीतच विसरले. ही बाब लक्षात येताच त्यांनी स्टेशन मास्तरांशी संपर्क साधला.

राकेश कुकरेजा यांनी आपले सुमारे पंचवीस हजार रुपये आणि कागपत्रे असलेली बॅग ट्रेनमध्ये विसरल्याचे सांगितले. यानंतर कर्जत येथील आरपीएफचे प्रभारी निरीक्षक व्हीएन सिंग यांनी तत्परता दाखविली. पोलीस शिपाई  एन एस पाटील यांनी तपास करून ही बॅग ताब्यात घेतली.राकेश कुकरेजा यांनी सांगितलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम या बॅगमध्ये होती. कर्जत आरपीएफने ही बत्तीस हजार सहाशे रुपये आणि कागदपत्र असलेली बॅग कुकरेजा यांना  परत केली.

व्ही एन सिंग, सी पी सिंग,  सहायक निरीक्षक दिनेश कुमार, एन एस पाटील, वि पी दिवाने, एम एल मीणा, फराहनाज अन्सारी आणि एस एन घोडके या  पोलिसांनी अनेकदा मोलाची कामगिरी केली आहे.

काही दिवसांपूर्वी खोपोली मधील एका महिलेचे हरवलेले दहा हजार रुपये देखील कर्जत रेल्वे पोलिसांनी परत केले होते. पोलिसांविषयी विविध स्वरूपाच्या तक्रारी पुढे येत असताना कर्जत रेल्वे पोलिसांच्या या प्रामाणिकपणाचे आणि तत्परतेने मात्र कौतुक होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत