कर्जत रेल्वे स्थानकातील सरकता जिना 30 जून अखेर होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाची माहिती

कर्जत : संजय गायकवाड

कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक दोन वर मुंबई दिशे कडे सुरू असलेल्या सरकत्या जिन्याचे काम  30 जून 2018 पर्यंत  पूर्ण होण्याची शक्यता आहे. अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यापूर्वी 31 मार्च 2018 पर्यंत या सरकत्या जिन्याचे काम पूर्ण होऊन प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तविली होती त्यामुळे जून अखेर तरी काम पूर्ण होते की नाही याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.


कर्जत रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोन वर सुमारे तीस लाख रुपये खर्च करून स्थानकातील पहिला सरकता जिना उभारण्यात येत आहे. त्याच्याच बाजूला मुंबई दिशे कडे उतरणाऱ्या जिन्याच्या पायऱ्यांचे काम सुरू आहे. सरकत्या जिन्याचे काम जोरात सुरू आहे तर बाजूच्या जिन्याचे काम गेल्या चार – साडेचार वर्षांपासून सुरू आहे. सरकत्या जिन्याच्या कामा बद्दल पहिल्यांदा विचारले असता 2018 मार्च अखेर काम पूर्ण होण्याची शक्यता कळविली होती. परंतु काम पूर्ण न झाल्याने ओसवाल यांनी पुन्हा प्रश्न विचारला असता आता 2018 जून अखेर पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे लेखी उत्तर ओसवाल यांना रेल्वे प्रशासनाने दिले आहे.
गेल्या चार – साडेचार वर्षांपासून सुरू असलेले मुंबई दिशेकडील पायऱ्यांच्या कामाबद्दल सुद्धा रेल्वे प्रशासनाने सारखे शक्यतांचे वायदेच दिले आहेत. सुरुवातीला 2018 मार्च अखेर पायऱ्यांचे काम पूर्ण होण्याची शक्यता सांगितली होती. मात्र आता 2018  मे अखेर पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचा वायदा केला आहे. वास्तविक पाहता पायऱ्यांचे काम पूर्ण होऊन काही प्रवासी त्यामधून वाट काढीत अडथळे पार करीत जिन्यावरून जातात परंतु जिना संपल्यानंतर जी जुनी भिंत आहे ती काढल्या नंतरच या पायऱ्यांचा मार्ग खुला होईल. आज आत्तासुद्धा ती भिंत तशीच असल्याने मे अखेर तरी या पायऱ्यांचा मार्ग खुला होऊन जिन्याचा वापर सुरू होईल ना? याकडे कर्जतकर रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.