कर्नाटकमध्येही कॉंग्रेसच्या प्रचाराची सुत्रे राहुल घेणार हाती

(रायगड माझा ऑनलाईन)

बंगळूर – गुजरातप्रमाणेच कर्नाटकमध्येही कॉंग्रेसच्या प्रचाराची सुत्रे पक्षाध्यक्ष राहुल गांधी स्वत:च्या हाती ठेवणार आहेत. राहुल 10 फेब्रुवारीपासून कर्नाटकचा तीन दिवसीय दौरा करणार आहेत. त्या दौऱ्यात ते पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडतील.

कर्नाटकमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या राज्यात कॉंग्रेसची सत्ता आहे. ती राखण्याचे मोठेच आव्हान कॉंग्रेसपुढे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच पक्ष प्रचार मोहिमेसाठी सज्ज होत आहे. या प्रचाराची धुरा अर्थातच राहुल सांभाळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे होमपिच असणाऱ्या गुजरातमध्ये राहुल यांना झंझावाती प्रचार केला. त्याचा मोठा फायदा कॉंग्रेसला होऊन पक्षाने लक्षणीय कामगिरी केली. त्या राज्यात विजय मिळवताना भाजपची अक्षरश: दमछाक झाली. त्या राज्यात राहुल यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. ती बाब ध्यानात घेऊन राहुल कर्नाटकमध्येही आघाडीला राहून कॉंग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ते अधिकाधिक काळ कर्नाटकमध्ये व्यतीत करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खर्गे, जी.परमेश्‍वर आणि डी.के.शिवकुमार या कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या वजनदार नेत्यांमुळे राहुल यांना प्रचारात खमकी साथ मिळेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत