कर्नाटकमध्ये निवडणुकीदरम्यान 37 कोटींची रोकड, दागिने जप्त

प्राप्तिकर विभागाची कारवाई; मागील वेळेपेक्षा पाच पट अधिक 

बंगळूर : रायगड माझा

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान प्राप्तिकर विभागाने रोकड आणि दागिने मिळून 37 कोटी 33 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तो मागील निवडणुकीवेळी हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालापेक्षा सुमारे पाच पट अधिक आहे.

कर्नाटकात 27 मार्चला निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली. त्या दिवसापासून आज प्रचार समाप्त झाल्याच्या दिवसापर्यंत प्राप्तिकर विभागाने 31 कोटी 50 लाख रूपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली. याशिवाय, स्पष्टीकरण देता न येऊ शकलेले 5 कोटी 83 लाख रूपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले. मागील निवडणुकीवेळी (2013) कर्नाटकमध्ये 4 कोटी 97 लाख रूपयांची रोकड आणि 3 कोटी 41 लाख रूपयांचे दागिने जप्त करण्यात आले होते.

यावेळी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पाहता कितीतरी अधिक प्रमाणात काळा पैसा निवडणुकीदरम्यान वापरण्यासाठी पुढे आल्याचे मानले जात आहे. कर्नाटक निवडणुकीसाठीचा प्रचार गुरूवारी समाप्त झाला. आता शनिवारी त्या राज्यात मतदान होईल. मतदान पार पडेपर्यंत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचा गैरवापर होणार नाही याची दक्षता विविध यंत्रणांना घ्यावी लागणार आहे.


शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत