कर्नाटकात कमळ उमलले, काँग्रेसचं पानिपत

कर्नाटक : रायगड माझा वृत्त

राज्यात भाजपचा झेंडा फडकावणाऱ्या भाजपसाठी अखेर दक्षिणेतलं द्वार मोकळे झाले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा धुव्वा उडवत बहुमताचा आकडा पार केलाय. ‘मोदी गो बॅक’ म्हणणाऱ्यांना कर्नाटकी जनतेनं ‘मोदी वेलकम’ करून सणसणीत चपराक लगावली आहे.

आक्रमक प्रचार, योग्य नियोजनाच्या बळावर भाजपने दक्षिणेत मोठा विजय मिळवलाय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. पण काही जागांवरच भाजप मागे होतं. मतमोजणीच्या दोन तासांनंतर भाजपने मुसंडी मारली आणि आघाडी घेतली. तर दुसरीकडे काँग्रेसला टक्कर देत जेडीएसनेही 40 जागांवर आघाडी घेतली. कुमारस्वामी यांनी तर 40 हुन जास्त जागा मिळाल्या तर मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकणार अशी घोषणाच करून टाकली. त्यामुळे कर्नाटक त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली.

पण, आकडेवारी बदलली आणि चित्र साफ झालं. भाजपने 100 जागांचा आकडा पार करत बहुमताकडे वाटचाल केली. भाजपसाठी हा मोठा दिलासा होता. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह संचारला. आणि काही वेळानंतर भाजपने बहुमतचा आकडा पार केला आणि ‘अब की बार येडीयुरप्पा सरकार’ हे स्पष्ट झालं.

2013 च्या निवडणुकीत भाजपने 40 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 122 जागा जिंकून एकहाती सत्ता राखली होती. यावेळी भाजपच्या दुप्पटीने जागा वाढल्यात. तर काँग्रेसच्या अर्ध्याने जागा कमी झाल्यात. राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतरही पहिलीच निवडणूक होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय.

मोदी लाट ओसरली असं म्हणणाऱ्या विरोधकांच्या शिडीतून कर्नाटकात विजय मिळवून भाजपने हवा काढून घेतलीये. 2019 च्या लोकसभा निवडणुकीची चाचणी परीक्षा भाजपने पास करून विरोधकांना अजून चांगला अभ्यास करा असा संदेशच आजच्या विजयातून दिलाय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत