कर्नाटक गेले आता भाजपचे लक्ष दक्षिणेतील ‘या’ राज्यावर!

हैदराबाद:रायगड माझा 

कर्नाटकमधील निवडणूक आणि त्यानंतरची सत्तास्थापनेची प्रक्रिया आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. सर्वाधिक जागा मिळूनही बहुमतासाठी थोड्या जागा कमी पडल्याने भाजपला सरकार स्थापन करता आले नाही. कर्नाटकातील अपयश विसरून आता भाजपने नव्या मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे.

दक्षिणेत भाजपला पहिल्यांदा सत्ता मिळवून देणारे राज्य कर्नाटक होते. आता यावर्षाच्या अखेरीस दक्षिणेतील तेलंगणात विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. भाजपने सर्व लक्ष तेलंगणावर केंद्रीत केल्याचे पक्षाचे अध्यक्ष के.लक्ष्मण यांनी सांगितले. ही निवडणूक 2019च्या लोकसभेच्या दृष्टीने देखील महत्त्वाची ठरणार आहे.

दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत अमित शहा यांनी तेलंगणावर फोकस केल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तेलंगणाबरोबरच आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिसा या राज्यातील निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

पुढील महिन्यात अमित शहा तेलंगणाला भेट देणार आहेत. आगामी निवडणुकीपूर्वीची परिस्थिती आणि धोरण ठरवण्यासाठी ही भेट असणार असल्याचे लक्ष्मण यांनी सांगितले. तेलंगणा विधानसभेत 119 जागा आहेत. तर राज्यात लोकसभेच्या 17 जागा आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत